Mumbai Crime : पॅन कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने मुंबईतील इसमाची फसवणूक, गुजरातमधून चौघे अटकेत
Mumbai Crime : पॅन कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने मुंबईतील इसमाची 1.40 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुजरातमधून चौघांना अटक केली आहे.
Mumbai Crime : सध्या सायबर गुन्हे (Cyber Crime) वाढले आहेत. त्यामुळे आपली वैयक्तिक माहिती, ओटीपी, आधार, पॅन क्रमांक, बँक खातं याची माहिती कोणालाही शेअर नका, असं वारंवार सांगितलं जातं. तरीही अनेक जण ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात. असाच प्रकार मुंबईत (Mumbai) घडला आहे. पॅन कार्ड (Pan Card) अपडेट करण्याच्या बहाण्याने मुंबईतील 47 वर्षीय इसमाची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. आरोपींनी या इसमाच्या बँक खात्यातून एक लाख 40 हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी मुंबईतील आंबोली पोलिसांनी गुजरातमधून चार जणांना अटक केली आहे. रोहित रविंद्र घुस्ते असं फसवणूक झालेल्या इसमाचं नाव आहे.
तक्रारदार रोहित रवींद्र घुस्ते यांच्या माहितीनुसार, 24 मार्च रोजी त्यांना अनोळखी मोबाईल फोनवरुन त्यांचे पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी कॉल आला होता. पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी घुस्ते यांच्या मोबाईल क्रमांकावर आरोपींनी एक लिंक पाठवली होती. लिंक मिळाल्यावर रोहित घुस्ते यांनी त्यावर क्लिक केलं पण इथेच त्यांनी मोठी चूक केली. या लिंकच्या माध्यमातून आरोपींनी त्यांच्या बँक खात्यातून 1 लाख 40 हजार रुपये लुटले.
या प्रकरणी रोहित घुस्ते यांनी आंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यानुसार भादंवि कलम 420 सह आयटी अॅक्ट कलम 66(क)(ड) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी केलेल्या तपासातमध्ये यातील आरोपी हे गुजरातमधील सूरत इथले असंल्याचं निष्पन्न झालं. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सूरतला रवाना झाली. या पोलीस पथकाने प्राप्त तांत्रिक माहितीच्या आधारावर सूरतमध्ये आरोपीचा शोध घेतला. यात आंतरराज्यीय टोळीचे चार आरोपी विपुल बोघरा (वय 32 वर्षे), प्रदीप रंगानी (वय 27 वर्षे), आशिष बोदरा (वय 32 वर्षे) आणि जेमीश विरानी (वय 25 वर्षे) यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, अटक केलेल्या आरोपींचा अधिक तपास केला असता त्यांच्याकडून एकूण 153 क्रेडिट कार्ड, 4 मोबाईल फोन आणि 1 टॅब जप्त करण्यात आला आहे. आंबोली पोलीस पुढील तपास करुन आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या आणि नमूद गुन्ह्यातील वॉण्टेड आरोपीचा शोध घेत आहोत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांनी दिली.