MHADA : म्हाडाची घरे मिळवून देतो, अधिकारी असल्याचं सांगत लाखो रुपयांची फसवणूक, पाच जणांना बेड्या
MHADA News : आरोपींनी तक्रारदाराकडून दहा लाख रुपये घेतले आणि बनावट कागदपत्रांवर सह्या घेऊन सदनिका अदा केल्याचं सागून फसवणूक केली.
ठाणे : म्हाडाचे अधिकारी, कर्मचारी असल्याचे सांगून म्हाडाची सदनिका ( MHADA Housing ) मिळवून देतो असे खोटे सांगत फसवणूक करणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखा युनिट-01 ने अटक केली आहे. त्यांच्यावर 420, 465, 467, 471, 120 - ब प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिरा-भाईंदर परिसरामध्ये काही लोक म्हाडाचे अधिकारी, कर्मचारी असल्याचे सांगून लोकांचा विश्वास संपादन करत होते. त्यानंतर म्हाडामध्ये सदनिका मिळवून देतो असे खोटे सांगून त्यांच्याकडून लाखो रुपये घेवून त्यांची फसवणूक करत होते.
याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात या आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास गुन्हे शाखा एक करत याप्रकरणी पोलिसांनी जावेद अल्लिशा पटेल, मोईनुद्दीन सलीमुद्दीन खान, ईशाद, सुजीत दत्ताराम चव्हाण, राजेंद्र प्रसाद यादव यांना ताब्यात घेण्यात आलं.
ताब्यात घेण्यात आलेल्यांची अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी लोकांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी आणि त्यांच्या इतर साथीदारांनी मिरा रोड येथील न्यू स्कायलाईन म्हाडा वसाहतीत तीन सदनिका मिळवून देण्यासाठी फिर्यादीकडून, दहा लाख रुपये घेतले होते. तसेच म्हाडाच्या विविध खोट्या आणि बनावट कागदपत्रांवर सह्या घेवून, सदनिका अदा केलेबाबत म्हाडाची बनावट खोटी कागदपत्रे देत फसवणूक केलेली होती.
शोभा बालाजी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भाईंदर पोलीस ठाण्यात कलम 420, 465, 467, 471, 120 - ब प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यात आरोपींना काशिमीरा गुन्हे शाखा कक्ष-01 कडून अटक करण्यात आली आहे. आता पुढील तपास भाईंदर पोलीस करणार आहेत. या आरोपींनी आणखी कुणाची साथ मिळाली आहे, यामागे आणखी कोण आहे याचा तपास सुरू आहे.
कोकण मंडळातील घरांसाठी म्हाडाची लॉटरी
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या वतीनं ठाणे शहर आणि ठाणे जिल्हा, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाच 311 सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये 1010 सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेतील आहेत. या योजनांसाठी प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत 7 नोव्हेंबर रोजी वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात येईल.
ही बातमी वाचा: