रसायनशास्त्रातील उच्च शिक्षणाचा वापर चक्क एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी, बदलापुरात थाटला कारखाना, पोलिसांना कुणकुण लागली अन्...
Badlapur Drugs : बदलापूरमध्ये एका तरुणाने रसायनशास्त्रातील उच्च शिक्षणाचा वापर एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात एमडी ड्रग्ज (MD Drugs) प्रकरण चांगलेच गाजले आहे. पुणे (Pune), नाशिकनंतर (Nashik) आता बदलापूरमध्ये (Badlapur) ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. बदलापूरमध्ये एका तरुणाने रसायनशास्त्रातील उच्च शिक्षणाचा वापर एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रसायनशास्त्रातील उच्च शिक्षणाचा वापर मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज बनविण्यासाठी करत एका तरुणाने बदलापूरमध्ये कारखाना थाटला होता. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अमली पदार्थ विरोधी विभागाच्या घाटकोपर कक्षाला याबाबत माहिती मिळाली. मुंबईच्या पथकाने बदलापूरमध्ये छापा टाकत कारखाना उद्ध्वस्त केला आहे.
चार आरोपींना अटक
या कारवाईत आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 33 लाख 60 हजार रुपये किमतीच्या एमडीच्या साठ्यासह एकूण 82 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. घाटकोपर कक्षाच्या पथकाने 11 सप्टेंबरला मानखुर्द येथे कारवाई केली होती. एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्यांच्याकडून 21 लाख 20 हजार रुपये किमतीचे 106 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले होते. त्यांच्या चौकशीतून एमडी पुरवठा करणाऱ्या तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.
ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त
यानंतर, एमडीचा पुरवठा करणाऱ्या एका आरोपीने बदलापूर-कर्जत महामार्गाजवळ वांगणी परिसरात ड्रग्ज बनविणाऱ्या कारखान्यातून ड्रग्ज आणल्याची माहिती दिली. त्यानुसार, घाटकोपर कक्षाने कारखान्याचा शोध घेत तेथे छापेमारी केली. यावेळी 206 किलोचे विविध प्रकारची रसायने, एक किलो 580 ग्रॅमची एमडीसदृश पांढऱ्या रंगाची पावडर आणि 62 ग्रॅमचे एमडी जप्त केले. या कारवाईत आरोपीने तयार केलेल्या एमडी ड्रग्जची विक्रीही केल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पुण्यात पुन्हा आढळले एमडी ड्रग्स
दरम्यान, मागील आठवड्यात पुण्यात पुन्हा एकदा एमडी ड्रग्स आढळून आले. कात्रज भागात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून 11 लाख 90 हजार रुपयांचे 54 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. मल्लीनाथ बसवराज गौडगाव , नौशाद अब्दुलअली शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कात्रज ते देहूरोड बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ दोघे जण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून 54 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
आणखी वाचा