पावणेदोन लाख रुपये बिल द्या, नाहीतर...; प्रसूती करणाऱ्या डॉक्टराकडून अंध दांपत्याच्या बाळाची परस्पर विक्री
Kalyan Crime : कल्याण तालुक्यातील गाळेगाव येथे राहत असलेले रोहित गुरव आणि केराबाई गुरव हे अंध दांपत्य ट्रेनमध्ये भीक मागून मिळणाऱ्या पैशातून आपला उदरनिर्वाह करतं.
Kalyan Crime : तुमच्या पोटातलं बाळ पाडू नका, होणारं बाळ दत्तक देऊ, असा सल्ला डॉक्टरांनी एका गरोदर महिलेला दिला. पण प्रत्यक्षात बाळ झाल्यानंतर मात्र, महिलेला आणि तिच्या पतीला बाळाचा साधा चेहरादेखील दाखवला नाही, परस्पर विकून टाकलं. उलट बिल द्या नाहीतर, बाळ द्या, अशी जाचक अट त्यांच्यापुढे ठेवली. हा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये (Kalyan News) घडला असून याप्रकरणी डॉक्टरविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण तालुक्यातील गाळेगाव येथे राहत असलेले रोहित गुरव आणि केराबाई गुरव हे अंध दांपत्य ट्रेनमध्ये भीक मागून मिळणाऱ्या पैशातून आपला उदरनिर्वाह करतं. त्यांना तीन वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी आहे. केराबाई गुरव यांना अस्वस्थ वाटत असल्यानं उत्तर तपासणीसाठी मोहणे येथील गणपती नर्सिंग होम येथील डॉक्टरांकडे गेल्या. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पाच महिने गर्भधारणा झाल्याचं सांगितलं. डॉक्टर अनिरुद्ध धोनी यांनी सर्व तपासण्या केल्यानंतर बाळ नॉर्मल असून गर्भपात न करण्यासाठी सल्ला त्यांना दिला. एवढंच नाहीतर होणारं बाळ आपण दत्तक देऊ असंदेखील डॉक्टरांनी सांगितलं.
डॉक्टरांनी केराबाई गुरव यांना होणारं बाळ दत्तक देऊ, असा सल्ला दिला. माझ्याकडे बाळ दत्तक घेणारे पालक आहेत. होणाऱ्या बाळाला मी माझ्याच भावाला दत्तक देणार आहे. त्या बदल्यात मी तुमच्या दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च करील असं सांगितलं. डॉक्टरच्या सल्ल्यानं मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. या आमिशाला बळी पडून गुरव दांपत्यानं मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. दिवसामागून दिवस जात होते. काही महिन्यांनी केरबाईंचे दिवस भरले प्रसूती वेदना होऊ लागल्या, त्यानंतर 23 ऑगस्टला केराबाई गुरव यांना गणपती नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं.
नेमकं घडलं काय?
केरबाईची नॉर्मल प्रसूती होऊन बाळ जन्माला आलं, जन्माला आलेलं बाळ गुरव दाम्पत्यांना डॉक्टरांनी दाखवलंसुद्धा नाही. डॉक्टरांनी परस्पर बाळाला कोणालातरी देऊन टाकलं. तसेच, दोन दिवसानंतर केराबाईंवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया देखील केली. सात दिवसानंतर गुरव दांपत्यानं ठरल्याप्रमाणे आपल्या दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची विनंती डॉक्टर अनिरुद्ध धोनीकडे केली. परंतु, डॉक्टर धोनीनं ही मागणी धुडकावून लावत त्यांनाच नॉर्मल डिलिव्हरीचे आणि
कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचे पावणेदोन लाख रुपये मागितले. तसेच, दवाखान्याचे बिल भरण्यास सांगितले. बिल द्या नाहीतर, बाळ द्या, अशी जाचक अट त्यांच्यापुढे ठेवली.
एका सामाजिक कार्यकर्त्यानं डॉक्टरला बाळ देण्याची विनंती केली. डॉक्टरनं त्या सामाजिक कार्यकर्त्याला धमकावलं. परंतु, पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची धमकी सामाजिक कार्यकर्त्यानं दिल्यानंतर आठ दिवसानंतर डॉक्टरनं बाळ स्वतः घरी आणून दिलं. या गंभीर घटनेची कल्याण खडकपाडा पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.