बीडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना, पैशाच्या वादातून माय लेकाने केला बापाचा खून
Beed Crime : गेल्या काही दिवसापासून रमेश यांची पत्नी आणि मुलगा त्याच्याकडे खर्चाच्या पैशाची मागणी करायचे आणि पैसे न दिल्यास त्याना वारंवार मारहाण देखील करायचे.
बीड : बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील बेगळवाडी येथे पैशाच्या वादातून मुलानेच आपल्या आईच्या मदतीने बापाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. रमेश सोनाजी शिंदे वय (वर्ष 38) असं मयत झालेल्या इसमाच नाव असून याप्रकरणी मुलगा आणि आईच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातल्या बंगळवाडी या ठिकाणी रमेश शिंदे आपली पत्नी हिराबाई आणि मुलगा ऋषीकेश यांच्यासह वास्तव्याला होते. गेल्या काही दिवसापासून रमेश यांची पत्नी आणि मुलगा त्याच्याकडे खर्चाच्या पैशाची मागणी करायचे आणि पैसे न दिल्यास त्याना वारंवार मारहाण देखील करायचे. 23 एप्रिल रोजी देखील रमेश याचा पत्नी आणि मुलासोबत पैशाच्या कारणावरून वाद झाला आणि हा वाद एवढा विकोपाला गेला की रमेशचा मुलगा ऋषिकेश आणि पत्नी हिराबाई यांनी रमेशला जबर मारहाण केली. यातच ऋषिकेशने वडील रमेश यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. त्यात त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्यानं त्यांना उपचारासाठी नेकनूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
रमेश शिंदे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने नेकनूरहून त्यांना बीडच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र त्या ठिकाणीही त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. म्हणून पुढील उपचारासाठी रमेशला पुण्याच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्या ठिकाणीच उपचारादरम्यान रमेश शिंदेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
मुलगा ऋषिकेश आणि पत्नी हिराबाई यांनी केलेल्या जबर मारहाणीमुळे रमेश शिंदे यांचा मृत्यू झाल्यास सांग बाबुराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात ऋषिकेश शिंदे आणि हिराबाई शिंदे या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खर्चाच्या पैशाच्या कारणावरून रमेशचा मुलगा आणि पत्नी नेहमी त्याच्यासोबत वाद घालायचे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा कौटुंबिक वाद शेवटी एवढा विकोपाला गेला की त्यामुळे रमेशला आपला जीव गमवावा लागला.