CBI : रशिया-युक्रेन युद्धासाठी मुंबईसह इतर शहरांतून मानवी तस्करी, सीबीआयकडून मोठं रॅकेट उघडकीस, गुन्हा दाखल
CBI : या छापेमारीत आत्तापर्यंत 35 जणांची मानवी तस्करी झाल्याचं तपासात समोर आलंय, जवळपास दहा ठिकाणी सीबीआयकडून सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
CBI : केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation (CBI) सीबीआयकडून मानवी तस्करीचं मोठं रॅकेट उघडकीस आलं आहे. रशिया-युक्रेन युद्धासाठी चक्क भारतातून मानवी तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सीबीआयकडून मुंबईसह दिल्ली, पंजाब, चंदीगड परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. या प्रकरणी सीबीआयकडून अनेक व्हिजा कन्सल्टन्सी आणि एजंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईसह एकूण सात शहरात छापेमारी
गेल्या सहा महिन्यांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. या युद्धासाठी मानवी तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सीबीआयने या प्रकरणात सर्वात मोठी कारवाई केली आहे. मुंबईसह एकूण सात शहरात सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली आहे. जवळपास दहा ठिकाणी सीबीआयकडून सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहिती मिळत आहे. या छापेमारीत 50 लाख रोख रक्कम, संशयास्पद कागदपत्र आणि तांत्रिक पुरावे आढळल्याची माहिती मिळत आहे. या छापेमारीत आत्तापर्यंत 35 जणांची मानवी तस्करी झाल्याचं तपासात समोर आलंय, सोबतच आणखी काही पीडित असल्याची देखील माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी सीबीआयकडून काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
नोकऱ्यांच्या खोट्या जाहिरातींना बळी पडू नये
सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी देणाऱ्या जाहिरातींमार्फत आकर्षित करत मानवी तस्करी झाल्याचं समोर आलं आहे. तसेच नोकऱ्यांच्या खोट्या जाहिरातींना बळी न पडण्याचे सीबीआयकडून आवाहन करण्यात आले आहे. या माध्यमातून तरुणांना परदेशात पाठवून ट्रेनिंग देऊन रशियामध्ये डांबून ठेवण्यात आलंय. या तरुणांना त्यांच्या इच्छेविरुद्ध रशिया युक्रेंच्या बॉर्डरवर बंदोबस्ताला तैनात करण्यात आलंय. काही तरुणांना गंभीर इजा होऊन ते जखमी झाल्याची माहिती सुद्धा समोर आलीय. त्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केलेली आहे.
दोन भारतीयांचा मृत्यू
आतापर्यंत सुमारे 35 पीडितांना परदेशात पाठवल्याची माहिती समोर आली आहे. रशिया-युक्रेन युद्धात रशियन सैन्याच्या वतीने सहाय्यक म्हणून लढताना दोन भारतीयांचा मृत्यू झाल्याची घटनाही समोर आली आहे. यामध्ये गुजरातमधील सुरत येथील 23 वर्षीय हमिल मांगुकिया आणि हैदराबाद येथील मोहम्मद अस्फान यांचा समावेश आहे. त्याला रशियात नोकरीचे आमिष दाखवून तेथे युद्ध करण्यास भाग पाडले गेले.
हेही वाचा>>>