CBI : नागपूर-भोपाळमध्ये CBI ची कारवाई, NHAI च्या अधिकाऱ्यासह 6 जण अटकेत, 20 लाखांची लाच घेतल्याचा आरोप
CBI : दोन दिवसांपासून दिल्ली सीबीआयचे पथक नागपुरात सापळा रचून बसलेले होते.
CBI : नागपूर (Nagpur)-भोपाळमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI)मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (National Highway Authority of India) चे 2 अधिकारी तसेच एका खाजगी कंपनीच्या 2 संचालकांसह 6 जणांना 20 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. अधिकाऱ्याच्या घरातून सीबीआयने लाचेच्या रकमेसह एकूण सव्वा कोटी रुपये जप्त केले आहेत.
NHAI अधिकाऱ्यांनी कामाच्या बदल्यात लाच स्वीकारल्याचा आरोप
रस्ते प्रकल्पासाठी प्रलंबित बिलांची प्रक्रिया आणि पूर्णत्वाचे प्रमाणपत्र जारी करणे यासह प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी NHAI अधिकाऱ्यांनी कामाच्या बदल्यात लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. दोन्ही आरोपी शासकीय अधिकारी असून ते भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात उच्च पदावर कार्यरत आहेत. आरोपींपैकी एक नागपुरातील प्रकल्प संचालक आहे, ज्याचे नाव अरविंद काळे असे आहे, तर दुसरा आरोपी ब्रिजेश कुमार साहू मध्यप्रदेशातील हरदा, NHAI चा उपमहाव्यवस्थापक आहे. भोपाळ येथील एका खासगी कंपनीचे दोन संचालक आणि दोन कर्मचारी अनिल बन्सल आणि कुणाल बन्सल यांच्यावरही लाच घेतल्याचा आरोप आहे.
नेमकं घडलं काय?
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एका खासगी कंपनीला कामाचे कंत्राट दिले होते. खासगी कंपनीने वेळेवर काम पूर्ण केले. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रकल्प व्यवस्थापक अरविंद काळे यांच्याकडे बिलही मंजुरीसाठी सादर केले. प्राधिकरणाने कंपनीचे बिल जमा करून घेतले. कंपनीने उर्वरित काम पूर्ण केले आणि बिलाची रक्कम मंजूर करण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक अरविंद काळे यांची भेट घेतली. त्यांनी लवकरच बिल मंजूर करून पैसे खात्यात टाकण्याचे आश्वासन दिले. गेल्या दोन महिन्यांपासून बिल मंजूर होत नसल्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्याने काळे यांची पुन्हा भेट घेतली आणि बिल मंजूर करण्याबाबत विचारणा केली. अरविंद काळे यांनी प्रकल्पाची रक्कम मिळवून देण्यासाठी कार्यालयातील 11 कनिष्ठ अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागेल. अन्यथा बील मंजूर करणार नसल्याचे स्पष्ट सांगितले
पदाचा दुरुपयोग करून संधी साधली
दोन दिवसांपासून दिल्ली सीबीआयचे पथक नागपुरात सापळा रचून बसलेले होते. रविवारी संधी मिळताच सीबीआयने काळे यांना पकडले. काळे यांच्यावर नागपूर विभागात सुरू असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी होती. त्यापैकी एक प्रकल्पाचे कंत्राट भोपाळच्या कंत्राटदाराला मिळाले होते. आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्या कंत्राटदाराला लाभ पोहोचवत असल्याची तक्रार दिल्ली सीबीआयला मिळाली होती. या तक्रारीवरून दिल्ली शाखेचे एक पथक नागपुरात पोहोचले होते. त्यानंतर काळे यांच्या नरेंद्रनगर येथील घराबाहेर सापळा रचला. रविवारी दुपारी भोपाळचा कंत्राटदार काळे यांच्या घरी आला. त्याने काळेंना 20 लाख रुपयांची लाच दिली. त्याच दरम्यान सीबीआयच्या पथकाने धाड टाकली. कंत्राटदाराने दिलेले 20 लाख रुपये जप्त करून काळे यांच्या घराची झडती घेतली. या झडतीत लाच रकमेसह सोन्याचे काही दागिने आणि महत्त्वाचे कागदपत्रही जप्त करण्यात आले.