स्वत:चं लग्न धुमधडाक्यात करण्यासाठी 10 कार, 6 दुचाकींची चोरी, भिवंडीतील तरुणाचा प्रताप
लग्नसोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी आणि बायकोला महागड्यात गाडीत फिरवण्यासाठी या बहाद्दरानं 10 महागड्या कार, सहा दुचाकी तसंच मंगळसूत्र चोरल्याची घटना घडली आहे.
भिवंडी : राजा राणीचा संसार थाटून वैवाहिक जीवन नव्याने सुरु करण्यासाठी एका गुन्हेगाराने ठरवले होते. विशेष म्हणजे त्याच्या लग्नाची तारीखही ठरली होती. मात्र लग्नसोहळा धुमधडक्यात साजरा करण्यासाठी व सासरच्या मंडळींवर रुबाब झडण्यासाठी तसेच होणाऱ्या बायकोला महागड्या कारमध्ये फिरविण्यासाठी, त्याला गरज होती. बक्कड पैशाची म्हणूनच त्याने एक दोन नव्हे तर अकरा गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. भिवंडीत लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
लग्नसोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी आणि बायकोला महागड्यात गाडीत फिरवण्यासाठी या बहाद्दरानं 10 महागड्या कार, सहा दुचाकी तसंच मंगळसूत्र चोरलं होतं. या गुन्ह्यात आरोपी शिवसिंगला लग्नाच्या अगोदर ताब्यात घेतलं आहे. आरोपी शिवलिंगचा येत्या 20 जानेवारी रोजी विवाह होणार होता. मात्र लग्न जुळवताना आपण खूप श्रीमंत आहोत.. असं सासरच्या मंडळींवर रुबाब दाखवण्यासाठी त्यानं हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे चोरीच्या वाहनातून तो होणाऱ्या बायकोला फिरविण्यासाठी नेत होता. शिवाय घरफोडीच्या गुन्ह्यातही याच चोरीच्या वाहनाचा वापर करीत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आणि त्याचा चोरीच्या पैश्यातून नवीन संसार थाटण्याचा मनसुबा पोलिसांनी उधळला लावला आहे.
भिवंडी शहरात विविध वाहने व सोनसाखळी, मोबाईल हिसकावून पळविण्याच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी पोलीस उपाआयुक्त योगेश चव्हाण यांनी सर्वच पोलीस ठाण्यात गस्त वाढविण्याचे आदेश दिले. त्यानुसार शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांच्यासह पथकाने तपास सुरु केला. एक मंगळसूत्र लंपास करणारा चोरटा भिवंडीत टेमघर पाईपलाईन परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी शिवसिंगला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यावर त्याचा चोरीच्या उद्देशाचा कारनामा समोर आला.
आरोपीकडून आतापर्यंत 6 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल शांतीनगर पोलिसांनी हस्तगस्त करून जप्त केला. तर पोलीस तपासात आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून यापूर्वी त्याने चार गुन्हे केले असून आतापर्यत 11 गुन्ह्यांची कबुली त्याने दिली आहे. तर आणखी या सराईत आरोपीने गुन्हे केल्याची शक्यता असल्याने याचाही तपास शांतीनगर पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस उपाआयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्त्वाच्या बातम्या