लॉरेन्स बिश्नोई गँगस्टरचा हाफ एन्काऊंटर; आरोपीच्या पायाला लागली गोळी, पोलिसांचा तपास सुरू
उत्तर प्रदेश पोलिसांनी मथुरा येथे अटक केलेल्या योगेश ऊर्फ राजूला पायात गोळी लागली आहे. योगेश हा युपीच्या बदायू येथील रहिवाशी असून अगोदर त्याच्याकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आल्याचं
मुथरा : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँग पुन्हा चर्चेत आली असून बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येची जबाबदारीही त्यांनीच स्वीकारली आहे. त्यामुळे, लॉरेन्स आणि त्याच्या गँगमधील सहकाऱ्यांचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यातच, उत्तर प्रदेशात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या शार्प शूटरचा हाफ एन्काऊंटर करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा येथे लॉरेन्स गँगचा शार्प शूटर राजू आणि पोलिसांमध्ये चकमक झाली असून पोलिसांकडून आरोपी राजूवर गोळी चालवण्यात आली, त्यामध्ये त्याचा पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी (Police) आरोपी राजूला अटक केली आहे. आरोपी हा लॉरेन्सच्या गँगसह हाशिम बाबाच्या गँगसाठी देखील काम करत होता. राजधानी दिल्लीतील एका जीम मालकाची हत्या केल्याच्या प्रकरणात राजू हा फरार होता. अखेर युपी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन हाफ एन्काऊंटर करत त्याला अटक केली आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी मथुरा येथे अटक केलेल्या योगेश ऊर्फ राजूला पायात गोळी लागली आहे. योगेश हा युपीच्या बदायू येथील रहिवाशी असून अगोदर त्याच्याकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. या राजूवर उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात लूट, खंडणी आणि हत्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. नुकतेच दिल्लीतील एका जीम मालकाच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग असल्याने पोलिसांकडून त्याचा तपास सुरू होता. दरम्यान, 12 ऑक्टोबर रोजी राजूचा साथीदार अयान यास पोलिसांनी अटक केली होती.
दिल्लीतील ग्रेटर नोएडा येथे झालेल्या नादिर शाह हत्याकांडमध्ये राजू हा मुख्य आरोपी आहे. नादिर शाह यांची गेल्याच महिन्यात 12 सप्टेंबर रोजी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी दुबईत राहणाऱ्या अनुप कुमार जुनेजा याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. नादिर शाह यांनी सन 2022 मध्ये केंद्र सरकार, दिल्ली पोलिस आणि राज्य सरकारला पत्र लिहून अनुप कुमार याच्याकडून हत्येची धमकी देण्यात आल्याचे म्हटले होते. त्यानंतर, 2 वर्षांनी नादिर शाह यांची हत्या करण्यात आली आहे. आता, महिनाभरानंतर पोलिसांनी आरोपी राजूला हाफ एन्काऊंटर करत अटक केली आहे.
हेही वाचा
24 तास अजित पवारांसोबत म्हणणाऱ्या दीपक मानकरांना रुपाली चाकणकरांचे सडेतोड प्रत्युत्तर