लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा उच्छाद; गर्दीचा फायदा घेत गणेशभक्तांच्या सोनसाखळ्या अन् मोबाइल लांबवले
याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी तत्पर कारवाई करत एकूण 15 आरोपींना अटक केली आहे.

Mumbai Crime : गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि सर्वात मोठ्या मिरवणुकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान (Lalbagh Ganapati Visarjan Miravnuk) मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडल्या. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईल आणि सोनसाखळ्या लांबवल्या. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी तत्पर कारवाई करत एकूण 15 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 10 दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान, शहराच्या, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि अगदी जालना, कोल्हापूर , रत्नागिरी आणि अहमदनगर येथूनही मंडपांना भेट देण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांच्या मोबाईल चोरीपासून सोनसाखळी हिसकावण्यापर्यंत चोरट्यांनी गणेशभक्तांच्या पाकिटांवर डल्ला मारला.
मोबाईल चोरीच्या 50 घटना, तीन जण तुरुंगात
मिरवणुकीदरम्यान तब्बल 50 मोबाईल चोरीला गेल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी 4 मोबाईल चोरी प्रकरणांत पोलिसांनी 10 गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले 4 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असतात. यंदाही नेमकी तीच परिस्थिती पाहायला मिळाली.
सोनसाखळी चोरीच्या 7 घटना
मोबाईल व्यतिरिक्त सोनसाखळी हिसकावण्याच्या सात घटना पोलिसांच्या निदर्शनास आल्या आहेत. त्यापैकी सहा प्रकरणांमध्ये पोलिसांनी एकूण १२ आरोपींना गजाआड केले आहे. विशेष म्हणजे दोन प्रकरणांमध्ये मुद्देमालही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. गर्दीतून सोनसाखळी हिसकावून पसार होणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी जाळे टाकले आणि त्यांना पकडण्यात यश मिळवले.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
लालबाग राजाच्या विसर्जनावेळी लाखो भाविकांचा समुद्र दर्शन आणि मिरवणुकीसाठी जमा होतो. गर्दीत चोरीची प्रकरणे वाढू नयेत यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईच्या गणेशोत्सवाचं सर्वात भव्य आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा अभूतपूर्व खोळंबा पाहायला मिळाला. 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू झालेली मिरवणूक तब्बल 33 तासांनंतर, 7 सप्टेंबरच्या रात्री उशिरा अखेर गिरीगाव चौपाटीवर विसर्जनानं संपन्न झाली.मूर्ती तराफ्यावर विराजमान झाल्यानंतरही, समुद्रात योग्य भरतीची प्रतीक्षा करावी लागली. भरतीची योग्य पातळी रात्री 9 वाजता प्राप्त झाल्यानंतरच विसर्जनाची प्रक्रिया सुरू झाली आणि लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं. 33 तासांच्या रखडलेल्या प्रक्रियेमुळे लाखो भाविकांना अपार संयम आणि श्रद्धेची कसोटी लागली होती.























