Kurla Best Bus Accident: घरातून निघताना भांडण झालेलं?, मानसिक स्थिती कशी होती?; बस चालक मोरेच्या पत्नीने सगळं सांगितलं!
Kurla Best Bus Accident: कुर्ला अपघात प्रकरणी बेस्ट बसचा चालक संजय मोरेला कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.
Kurla Best Bus Accident मुंबई: मुंबईच्या एलबीएस रोडवर कुर्ला परिसरात सोमवारी रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात (Kurla Best Bus Accident) झाला होता. बेस्ट बस कुर्ला येथील गजबजलेल्या परिसरातून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट गर्दीत शिरली. या अपघातात अनेकजण चिरडले गेले. बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात आतापर्यंत एकूण 7 जणांचा मृत्यू असून 49 जण जखमी झाले आहेत.
कुर्ला अपघात प्रकरणी बेस्ट बसचा चालक संजय मोरेला कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. आज बस चालकाला कुर्ला कोर्टात हजर केले जाईल. मात्र या प्रकरणात संजय मोरे यांची काहीही चूक नाही. ते कधीच मद्यपान करत नाही. चालक म्हणून ही अनेक वर्ष ते काम करीत होते, बेस्टमध्ये चार वर्षांपासून ते चालक होते, या बस चालवण्याचे ट्रेनिंग घेतले होते मात्र बसमध्येच तांत्रीक बिघाड असावा, अशी प्रतिक्रिया चालक संजय मोरेच्या कुटुंबियाने एबीपी माझाशी बोलताना दिली.
माझे बाबा संजय मोरे कधीच मद्यपान करत नाही-
संजय मोरे मद्यपान करुन गाडी चालवत होते, या बातम्या खोट्या आहेत. माझे बाबा संजय मोरे मद्यपान कधीच करत नाही. त्यांच्याकडे 1989 पासून गाडी चालवण्याचा परवाना आहे. काहीजण बोलताय 1 डिसेंबरपासून बस चालवायला घेतली, हे पूर्ण खोटं आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून कोरोनाच्या लॉकडाऊननंतर माझे बाबा बेस्टमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करतायत. गेल्या 35 वर्षांपासून पाहतोय ते गाडी चालवतायत. इतके दिवस काही अपघात झाला नाही आणि आजचं कसा झाला?, ते अत्यंत सावधगतीने गाडी चालवात. त्यामुळे काल जो अपघात झाला तो बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळेच झाला आहे, दावा बस चालक संजय मोरे यांच्या मुलाने केला आहे. अपघातग्रस्त बस 15 दिवसांपूर्वीच हातात घेतली होती. त्याआधी 10 दिवस त्यांचं ट्रेनिंग झालं होतं, अशी माहिती देखील संजय मोरे यांच्या मुलाने दिली.
कामावर जाताना भांडण झालं होतं?, पत्नीने सर्व सांगितलं!
संजय मोरे काल कामावर जाताना काय घडलं होतं का?, त्यांची मानसिक स्थिती योग्य होती का?, घरातून निघताना भांडण झालं होतं का?, असा सवाल संजय मोरे यांच्या पत्नीला विचारण्यात आला. यावर जसं नेहमीप्रमाणे कामावर निघतात, तसेच ते गेले. सकाळी काहीही झालं नव्हतं. आम्ही दोघंही नेहमीप्रमाणे आमच्या स्टॉलवर गेलो. ते तिकडून 1 वाजता कामावर जायला निघाले. ते नेहमी वेळेवर जातात. माझा नवरा दारु कधीच घेणार नाही, कधीही ते मान वर करुनही बोलले नाही. आज माझ्या लग्नाला 23 वर्षे झाली. पण अजूनपर्यंत कधीही अपघात झाला नव्हता. माझा नवरा संजय मोरे निर्दोष आहे, त्यांची नक्की सुटका होईल. कारण त्यांनी कधीच कोणाचं वाईट बघितलेलं नाही. काल जी घटना झाली, ते चुकून झाली आहे. त्यात काय करणार...तुमच्या गाड्या व्यवस्थित नाही. बसचा काहीतरी दोष असावा. माझ्या नवऱ्याची काहीही चूक नाही, असं संजय मोरे यांच्या पत्नीने सांगितले.