Kurla Best Bus Accident: बसची फॉरेंसिक टीमकडून तपासणी, आरटीओचे अधिकारीही दाखल; तज्ञ म्हणाले, तर बस पुढेच जाणार नाही!
Kurla Best Bus Accident: सदर अपघातग्रस्त बस सध्या कुर्ला पश्चिम येथील बस डेपोमध्ये आणण्यात आली आहे.
Kurla Best Bus Accident मुंबई: कुर्ला एलबीएस मार्गावर काल (9 डिसेंबर)ला झालेल्या मोठ्या अपघातात बेस्ट बसने (Kurla Best Bus Accident) अनेक पादचाऱ्यांना चिरडलं. कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू तर 49 जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून पुढची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, बस चालक संजय मोरे याआधी छोट्या मिनीबस आणि इतर गाड्या चालवत होता. पण त्याला मोठी बस चालवण्याचा अनुभव नव्हता, अशी माहितीही समोर आली आहे.
सदर अपघातग्रस्त बस सध्या कुर्ला पश्चिम येथील बस डेपोमध्ये आणण्यात आली आहे. या बसच्या जवळ कोणाला ही सोडले जात नाही आहे. बसच्या काचा फुटल्या असून फॉरेंसिक टीमकडूनही या बसची तपासणी झाल्याची माहिती आहे. तसेच आरटीओची टीम अपघातग्रस्त बसची पाहणी करण्यासाठी बस डेपोमधे दाखल झाली आहे. दरम्यान, बस चालक संजय मोरेकडे आहे अवजड वाहन चालवण्याचा परवाना आहे. पोलिसांनी आरोपीचा वाहन चालवण्याचा परवाना ताब्यात घेतला आहे. आरोपी संजय मोरेला ड्रायव्हर म्हणून कामाला ठेवताना निकष पाळण्यात आले होते का याची चौकशी होणार असून बेस्ट प्रशासनाशी बोलून पोलीस पडताळणी करण्यात येणार आहे.
बसमध्ये कुठलाही बिघाड नसल्याचे समोर-
पोलिसांनी इलेक्ट्रिक बस बनवणारी कंपनी आणि काही तज्ञांशी संवाद साधला. इलेक्ट्रिक बस पूर्णपणे सुस्थितीत आहे. बसमध्ये कुठलाही बिघाड नसल्याचे समोर आले आहे. इलेक्ट्रिक बसमध्ये ब्रेक फेल झाल्यावर किंवा काही मोठा तांत्रिक बिघाड झाल्यास बस पुढे जात नाही, असा तज्ञांनी दावा केला आहे. तर बेस्टकडे असलेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये ही व्यवस्था आहे, त्यामुळे अपघातग्रस्त बसचे ब्रेक फेल झाल्याचा दावा खोटा असल्याचे तज्ञांचे मत आहे.
कुर्ला स्टेशनबाहेरील बस स्थानक आज बंद-
अपघातग्रस्त बसचा चालक संजय मोरेला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आज अपघातस्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले आहे. तर कुर्ल्यातील भीषण अपघातानंतर कुर्ला स्टेशनबाहेरील बस स्थानक आज बंद आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून बेस्ट प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.