Kalyan Crime Vishal Gawali: कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या
Vishal Gawali ends life Taloja Jail: कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाची तळोजा कारागृहात आत्महत्या. तुरुंगातील टॉयलेटमध्ये गळफास लावून घेतला.

नवी मुंबई: कल्याणमध्ये अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम आरोपी विशाल गवळी याने नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात (Taloja Jail) आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशाल गवळी (Vishal Gawali) याने तुरुंगातील कोठडीत गळफास लावून आत्महत्या केल्याचे समजते. तळोजा कारागृहात पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास विशाल गवळी याने शौचालयात जाऊन गळफास लावून घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे तळोजा कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. विशाल गवळी याच्या आत्महत्येनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. निवृत्त न्यायाधीशांकडून याप्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे समजते. (Kalyan Crime News)
विशाल गवळी याने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून स्वत:च्या घरी आणले होते. घरात त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून विशालने घरातच या मुलीची हत्या केली होती. त्यानंतर विशाल गवळीने या मुलीचा मृतदेह बापगाव परिसरात फेकून दिला होता. त्यानंतर विशाल गवळी हा शेगावला पळून गेला होता. शेगाव पोलिसांनी सापळा रचत शिवाजी चौकातील एका सलूनमधून त्याला ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर कल्याण परिसरात संतप्त पडसाद उमटले होते.
विशाल गवळी हा कल्याणमधील सराईत गुंड होता. त्याच्यावर बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड करणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद होती. कल्याण पूर्व परिसरात त्याच्या दहशतीमुळे अनेक कुटुंब हा परिसर सोडून गेली होती. मात्र, विशाल गवळी याला राजकीय वरदहस्त असल्याने त्याच्याविरोधात कठोर कारवाई होत नव्हती. विशाल गवळीने अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिची हत्या केल्यानंतर मित्रासोबत जाऊन दारु विकत घेतली होती. त्यानंतर तो शेगावला पळून गेला होता.
विशालची आतापर्यंत तीन लग्न झाली आहेत. त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत. तर तिसरी बायको एका खाजगी बँकेत नोकरीला होती. विशाल गवळीने पहिल्या दोन बायकांप्रमाणे आपल्याला सोडून देऊ नये यासाठी पत्नीने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली होती. या दोघांनी एका रिक्षातून मृतदेह भिवंडीजवळील बापगाव परिसरात दोघांनी मिळून फेकून दिला होता.
आणखी वाचा
धक्कादायक! 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन संपवलं, मृतदेह फेकून दिला, कल्याणमधील घटनेने मोठी खळबळ
























