(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crime : तीन सख्ख्या बहिणींचा कारनामा! रिकामं घर हेरायच्या अन् मग डल्ला मारायच्या, पोलिसांकडून बेड्या
Kalyan Crime News: इमारतीमधील रिकामे घरे हेरून बनावट चावीने घराचे कुलूप उघडून घरफोडी करणाऱ्या तीन सख्ख्या बहिणींना कल्याण क्राईम ब्रांचने बेड्या ठोकल्या आहेत.
Kalyan Crime News: इमारतीमधील रिकामे घरे हेरून बनावट चावीने घराचे कुलूप उघडून घरफोडी करणाऱ्या तीन सख्ख्या बहिणींना कल्याण क्राईम ब्रांचने बेड्या ठोकल्या आहेत. सारिका सकट, मीना इंगळे , सुजाता सकट अस या तिन्ही बहिणींची नावं आहेत. डोंबिवली येथे एका घरात चोरी करून या तिघी बहिणी आपल्या कुटुंबासह जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या तिन्ही बहिणींना बेड्या ठोकत त्यांच्याकडून 23 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे. या तिघींनी आतापर्यंत किती ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत याचा तपास पोलीस करत आहेत .
डोंबिवली पूर्व राम नगर परिसरात एका इमारती मधील बंद घरात चोरी झाली होती. चोरट्यांनी घरात कुणी नसल्याची संधी साधत बनावट चावीने दरवाजा उघडून घरातील 23 तोळे सोन्याचे दागिने चोरले होते. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये चोरी करणाऱ्या तीन महिला कैद झाल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या तिन्ही महिलांचा शोध सुरू केला.कल्याण क्राईम ब्रांचने डोंबिवली स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यांना या महिला स्टेशनहून ट्रेनने मुंबईच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. पुढे पोलिसांनी प्रत्येक रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही तपासले असता घाटकोपर येथे महिला उतरल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आलं.
या तिन्ही महिला मानखुर्द, कुर्ला परिसरातील असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या तिन्ही महिलांचा शोध घेणं सुरू केलं. तांत्रिक तपासादरम्यान पोलिसांना या तिन्ही महिला सहकुटुंब जेजुरी येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ जेजुरी येथे सापळा रचत या तिन्ही महिलांना जेजुरी येथून अटक केली आहे.
पोलिसांनी महिलांकडून चोरीचे 23 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या तिघी कधीपासून चोऱ्या करत आहेत आणि अजून किती ठिकाणी अशा प्रकारच्या चोऱ्या केल्यात याचा तपास पोलीस घेत आहेत. या आधी त्यांच्या विरोधात मुंबई-ठाणे परिसरातील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण क्राइम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी दिली.