Crime News : रेल्वेत प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या चोर महिलेला अटक; कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई
Crime News : कल्याण रेल्वे स्थानकात चलाखीने प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या दोन चोर महिलेपैकी एकीला अटक करण्यात आली आहे.
Crime News : रेल्वे स्थानकावर प्रवासी चढताना-उतरताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशाना लुबाडणाऱ्या दोन सख्ख्या बहिणी मधील एकीला कल्याण रेल्वे पोलिसानी अटक केली आहे. पूजा शिंदे असं या अटक केलेल्या महीलेच नाव असून तिची बहिण हिना भोसले ही पसार झाली आहे. पोलीस तिचा शोध घेत असून या दोघींविरोधात याआधी देखील कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
कल्याण रेल्वे स्थानकावर मेल एक्स्प्रेस, लोकल गाड्या आल्यानंतर प्रवाशांच्या गर्दीत चोरीच्या घटना मध्ये वाढ झाली होती. त्यामुळे पोलिसांनीदेखील आपली गस्त वाढवली होती. कल्याण रेल्वे पोलीसदेखील चोरांचा शोध घेत होते. यादरम्यान दोन जून रोजी कल्याण रेल्वे स्थानकात आलेल्या एक्सप्रेस गाडीत चढताना एका महिलेकडे दागिने असलेला डबा गर्दीचा फायदा घेत आरोपी पूजा हिने चोरला. आपली पर्स खेचली जात असल्याचे पाहून महिलेने पूजाचा हात पकडून तिला जाब विचारला. मात्र, पुजाने महिलेच्या हाताला झटका देत पळ काढला. याच दरम्यान तिने चोरलेला डबा बहीण हिनाच्या हातात दिला.
महिलेने बाहेर असलेल्या पतीला आपल्या पर्समधून दागिन्याचा डबा घेऊन चोर पळत असल्याचे सांगताच पतीने प्रवाशांच्या मदतीने पूजाला पकडून कल्याण रेल्वे पोलिसात आणले. तिच्या अंगझडतीत तिच्याकडे दागिन्याचा डबा मिळाला नाही. पोलिसांनी तिला विश्वासात घेत चौकशी केली असता तिने आपल्या बहिणीकडे दागिन्याचा डबा दिल्याची कबुली दिली.
पूजा व हिना या दोघी बहिणी लोकल, एक्स्प्रेसमध्ये चढताना-उतरताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत चोरी करायच्या. या दोघींमध्ये एक बहीण चोरी करायची व हातचलाखीने चोरी केलेली वस्तू लगेच दुसऱ्या बहिणीच्या हातात द्यायची. ही वस्तू घेत ती पसार व्हायची. त्यामुळे पकडले गेल्यावर त्यांच्याकडे काहीच मिळत नव्हते.
अखेर तक्रारदार महिलेने दाखवलेले प्रसंगावधान व प्रवांशांच्या सतर्कतेमुळे या दोन बहिणींपैकी एकीला गजाआड करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. या दोन बहिणी मागील अनेक दिवसापासून गर्दीच्या लोकलमध्ये मागील अनेक वर्षापासून एकत्रित चोरी करत होत्या त्यांनी यापूर्वी अशाप्रकारे किती गुन्हे केलेत? याचा शोध सुरु असल्याचे कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आंधळे यांनी सांगितले.