Kalyan crime: कल्याणमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, देवेंद्र फडणवीसांचा आयुक्तांना फोन करुन आदेश सोडला, म्हणाले...
Kalyan crime girl death case: मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीला फरपटत ठाण्यात आणलं, फडणवीसांचा आयुक्तांना फोन अन् महत्त्वाचा आदेश
कल्याण: अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याला गुरुवारी सकाळी ठाण्यात आणण्यात आले. विशाल गवळीला बुधवारी बुलढाण्यातील शेगाव येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुढील तपासासाठी त्याला कल्याण पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरुन चर्चा केली.
कल्याणमधील घटना गंभीर आहे. विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला अटक झाली, हा खटला जलदगती न्यायालयात चालवा. आरोपीला फाशी होईल, हे सुनिश्चित करा, असे कठोर आणि स्पष्ट निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. याशिवाय, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विशाल गवळी याच्यावर पोलिसांकडून झटपट कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आज कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात डीसीपींची भेट घेण्यासाठी येणार आहेत.
या घटनेनंतर कल्याणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपी विशाल गवळी याने यापूर्वीही महिलांवर बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे. त्याच्या दहशतीमुळे अनेक स्थानिक नागरिकांनी घाबरुन परिसर सोडल्याची माहिती समोर आली होती. मंगळवारी सकाळी कल्याण-पडघा रस्त्यावरील बापगाव येथे संबंधित मुलीचा मृतदेह सापडला होता. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाईला सुरुवात केली होती. त्यावेळी विशाल, त्याची बँकर पत्नी साक्षी यांनी रिक्षातून संबंधित मुलीचा मृतदेह बापगाव येथे आणून फेकल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर पोलिसांनी साक्षी गवळी हिच्यासह अनेकांना ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली होती. त्यावेळी विशाल गवळी हा त्याच्या पत्नीच्या माहेरी म्हणजे शेगावला जाऊन लपल्याची माहिती समोर आली होती. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला शेगावमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या होत्या.
पुन्हा अक्षय शिंदेसारखीच केस?
पोलिसांनी विशाल गवळी याला अटक केल्यानंतर आता एक नवीन माहिती समोर आली आहे. विशाल गवळी हादेखील अक्षय शिंदे याच्याप्रमाणे मनोरुग्ण असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, या सगळ्यात कितपत तथ्य आहे, याची माहिती तपासातून स्पष्ट होईल. त्यामुळे आता विशाल गवळी पोलीस चौकशीत काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
आणखी वाचा
कल्याणमधील मुलीचं अपहरण करणाऱ्या विशाल गवळीला राजकीय वरदहस्त, अनेक कुटुंबांनी घाबरुन परिसरही सोडला