Kalyan Crime News: कल्याणमधील मुलीचं अपहरण करणाऱ्या विशाल गवळीला राजकीय वरदहस्त, अनेक कुटुंबांनी घाबरुन परिसरही सोडला
Kalyan Crime News: विशाल गवळी हा बदलापूर अत्याचार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदपेक्षाही वरचढ असल्याचे समोर आलं आहे.
Kalyan Crime News: कल्याण पूर्वमध्ये 13 वर्षीय मुलीचं अपहरण (Kalyan Crime News) करुन तिची हत्या झाल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला (Vishal Gawali) अटक केली आहे. आरोपी विशाल गवळी हा शेगावमध्ये असल्याची माहिती पोलिसांना सकाळी मिळाली. यावरुन शेगाव पोलिसांनी सापळा रचत शिवाजी चौकातील एका सलूनमधून शेविंग करत असताना त्याला ताब्यात घेतलं. आरोपी दाढी काढून आपला लूक बदलण्याच्या विचारात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सध्या विशाल गवळी याला शेगाव पोलीस स्थानकात ठेवण्यात आलं आहे.
सदर प्रकरणातील आरोपी विशाल गवळी हा बदलापूर अत्याचार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदपेक्षाही वरचढ असल्याचे समोर आलं आहे. विशालची आतापर्यंत तीन लग्न झाली आहेत. त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत. तर तिसरी बायको एका खाजगी बँकेत नोकरीला आहे. विशाल गवळीने याआधी क्लासवरुन घरी जाणाऱ्या एका मुलीवर भररस्त्यात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विशाल गवळीला राजकीय वरदहस्त, काही कुटुंब परिसर सोडून निघून गेली-
आतापर्यंत बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड करणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे. कल्याण पूर्व परिसरात त्याची दहशत असून काही कुटुंब परिसर सोडून निघून गेली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे विशाल गवळीला राजकीय वलय असल्याची माहिती समोर आली आहे. दाखल गुन्ह्यांमधील फिर्यादींना दमदाटी करुन ते मागे घेण्यास भाग पाडतो अशीही चर्चा आहे. त्यामुळे त्याच्या नेमका कोणाचा आशीर्वाद असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नेमकी घटना काय?
कल्याण पूर्वमधील चक्कीनाक भागातील अल्पवयीन मुलगी सोमवारी दुपारी घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली होती. त्यानतंर काल सकाळी बापगाव परिसरात काल सकाळी तिला मृतदेह सापडला. विशाल गवळी या नराधमाने तिचं अपहरण करुन हत्या केली. त्यानंतर मृतदेह भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरात फेकून दिला होता. दरम्यान या अपहरण आणि हत्या प्रकरणात विशाल गवळीच्या तिसऱ्या पत्नीने त्याला मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशाल गवळीने पहिल्या दोन बायकांप्रमाणे आपल्याला सोडून देऊ नये यासाठी पत्नीने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली. एका रिक्षातून मृतदेह भिवंडीजवळील बापगाव परिसरात दोघांनी मिळून फेकून दिल्याचे निष्पन्न झालं आहे. दरम्यान, कल्याणमध्ये झालेली घटना ही दुर्दैवी आहे. आरोपींना अटक झालेली असून केस फास्टट्रॅक कोर्टात चालावी आणि आरोपींना फाशी व्हावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिली.