Jalgaon Crime : 33 लाखांचा संतूर साबण घेऊन ट्रक चालक आणि मालक पसार, जळगावातील घटना
Jalgaon Crime : जळगावात 33 लाख रुपये किमतीचा संतूर साबण घेऊन ट्रक चालक आणि मालक पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Jalgaon Crime : आजपर्यंत चोरीच्या अनेक घटना घडल्याचं आपण ऐकलं आणि वाचलं असेल. परंतु जळगावात (Jalgaon) चोरीचा अजब प्रकार समोर आला आहे. जळगावात 33 लाख रुपये किमतीचा संतूर साबण (Santoor Soap) घेऊन ट्रक चालक आणि मालक पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलिसात (Amalner Police) दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अमळनेर शहरातील विप्रो कंपनीतील सुमारे 33 लाखाचा संतूर साबण घेऊन निघालेला ट्रक सांगितलेल्या ठिकाणी न पोहोचल्याने अमळनेर पोलिसात दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, "विप्रो कंपनीतील साबणाचा माल तुमकुर (कर्नाटक) या राज्यात पोहोचवायचा होता. यासाठी मामा ट्रान्सपोर्ट या कंपनीकडून आर जे 11 जी ए 8138 हा ट्रक भाड्याने घेण्यात आला होता. हा ट्रक पुष्पेंद्रसिंग सुदानसिंग चहर (रा.मुरलीविहार, देवरौठा शाहगंज, आग्रा उत्तर प्रदेश) याच्या मालकीचा होता. तर कैलाश श्रीराम गुजर (रा.हर्षलो का खेडा पो.भानूनगर ता.जहाजपूर जि.भिलवाडा राजस्थान) हा ट्रकचा चालक होता
33 लाख 2 हजार 678 रुपये किमतीचे संतूर साबण चोरले
4 जानेवारी रोजी संबंधित ट्रकमध्ये विप्रो कंपनीतून 10 टन 100 किलो वजनाचा संतूर साबण तुमकुर (कर्नाटक) इथे पोहोचण्यासाठी मामा ट्रान्सपोर्टमार्फत 62 हजार 445 रुपये भाडे ठरवून गाडी भरण्यात आली होती. या कामासाठी चालक आणि मालक यांना 50 हजार रुपये देऊन गाडी रवाना करण्यात आली होती. हा ट्रक 9 जानेवारी रोजी तुमकुर इथे पोहोचणं आवश्यक होतं. मात्र माल त्याठिकाणी पोहोचला नसल्याने, चालक आणि मालक यांच्याशी संपर्क केला. परंतु दोघांचे फोन बंद येत असल्याने फसवणूक झाल्याचं कंपनीच्या लक्षात आलं. ट्रक चालक आणि मालक यांनी संगनमत करुन ट्रकमधील 980 बॉक्समधील सुमारे 10 टन 100 किलो वजनाचे जवळपास 33 लाख 2 हजार 678 रुपये किमतीचा संतूर साबणाच्या मालाचा अपहार केल्याचे दिसून आलं.
चालक आणि मालकाविरोधात गुन्हा
या प्रकरणी विप्रो कंपनीतील लोडिंग मॅनेजर अनिलकुमार माईसुख पुनिया यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन चालक कैलाश गुजर आणि मालक पुष्पेद्रंसिंह चहर या दोन जणांविरुद्ध भादंवि कलम 406, 407, 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करत आहेत.
हेही वाचा
Jalgaon Crime : अडीच लाख देऊन लगीनगाठ बांधली, चार दिवसातच नवी नवरी पळाली!