(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon Crime : अडीच लाख देऊन लगीनगाठ बांधली, चार दिवसातच नवी नवरी पळाली!
Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव शहरातील एका व्यापाऱ्याने अडीच लाख रुपये देऊन एका तरुणीशी लग्न केले होते. मात्र लग्नानंतर अवघ्या चार दिवसांतच नवरी मुलगी रफुचक्कर झाल्याचं समोर आलं.
Jalgaon Crime : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव शहरातील एका व्यापाऱ्याने अडीच लाख रुपये देऊन एका तरुणीशी लग्न (Marriage) केले होते. मात्र लग्नानंतर अवघ्या चार दिवसांतच नवरी मुलगी रफुचक्कर झाल्याचं समोर आलं. जळगाव शहरात शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. या प्रकरणी महिलेसह मध्यस्थ असलेल्या एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मध्यस्थाला अडीच लाख रुपये देऊन मुलीशी लग्न
जळगाव शहरातील कांचन नगरात शैलेंद्र किशनलाल सारस्वत (वय 46 वर्षे) हे व्यावसायिक राहतात. त्यांचा 2007 मध्ये लग्न होऊन घटस्फोट (Divorce) झाला होता. यानंतर 2022 मध्ये सारस्वत यांना दुसऱ्या लग्नासाठी प्रकाश सोनी या मध्यस्थामार्फत एक स्थळ पाहिलं होतं. मध्यस्थाला दोन लाख 61 हजार रुपये देऊन मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. पसंती झाल्यानंतर शैलेंद्र सारस्वत आणि तरुणीचा विवाहसोहळा सुद्धा पार पडला. लग्नानंतर गुलाबी स्वप्न पाहत असतानाच चारच दिवसांनी पत्नीने मुंबईला (Mumbai) भावाकडे जायचं असल्याचं सांगितलं. नव्या नवरीचा आग्रह मान्य करुन सारस्वत तिला सोडण्यासाठी मुंबईला गेले. मुंबईच्या स्थानकावर रेल्वेचं तिकीट काढत असताना त्यांची पत्नी स्थानकावरुन रफूचक्कर झाली, ती आजपर्यंत परत आलीच नाही.
पैसेही गेले, पत्नीही पळून गेली...
महिलेच्या नातेवाईकांकडे तसेच इतर ठिकाणी तिचा शोध घेतला. शैलेंद्र सारस्वत यांनी पत्नीला सासरी परत पाठवण्यासंदर्भात नातेवाईंकाकडे पाठपुरावा केला. मात्र ती येत नसल्याने लग्नासाठी दिलेले अडीच लाख रुपये परत द्यावे, अशी मागणी केली. मात्र पैसे परत मिळाले नाहीत, पळून गेलेली बायकोही परत आली नाही, त्यामुळे कंटाळलेल्या व्यापाऱ्याने तब्बल सात महिन्यानंतर शनिपेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन अपर्णा चंद्रकांत नाईक (रा. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग) आणि प्रकाश सोनी (रा. बेळगाव) या दोन जणांविरुद्ध भादंवि कलम 420, 406, 34 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिपेठ पोलीस स्टेशनेचे एपीआय चव्हाण या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मध्यस्थांची मोडस ऑपरेंडी काय?
राज्यभरात याआधीही अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. एजंट अर्थात मध्यस्थ असं कुटुंब हेरतात ज्यांच्या घरातील मुलाचं/मुलीचं लग्न ठरत नाही. तुमच्या मुलाच मुलीचं लग्न लावून देतो असं सांगत एजंट संबंधित व्यक्तीला किंवा त्यांच्या पालकांना दिलासा देतात. चिंताग्रस्त असलेली व्यक्ती अशा एजंटवर विश्वास ठेवतात. त्यानंतर मध्यस्थ त्यांच्याकडून ठराविक रक्कम मागून मुलीला लग्नासाठी उभं करतात. लग्न झालं की अवघ्या काही दिवसात किंवा महिन्यात ही मुलगी घरातून काही ना काही कारणाने पळ काढते.