(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fatka Gang : रेल्वे ट्रॅकवरच्या फटका गँगमुळे आयुष्य उद्ध्वस्त, तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या जगनचे दोन्ही पाय निकामी
Fatka Gang At Mumbai Local: मोबाईल चोरण्यासाठी फटका गँगने प्रवाशाच्या हातावर फटका मारला आणि त्यामुळे त्या प्रवाशाचा तोल जाऊन अपघात घडला.
ठाणे : रेल्वे ट्रॅकवर सक्रिय असलेल्या फटका गँगमुळे एका 31 वर्षाच्या तरूणाचे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. लोकलमधून प्रवास करताना फटका मारण्यात आल्याने जगन जंगले या तरुणाचा अपघात होऊन त्याचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे तीनच महिन्यापूर्वी जगनचे लग्न झाले होते. या घटनेने तीव्र संताप व्यक्त होत असून यातील नेमक्या प्रकाराचा आणि आरोपीचा शोध ठाणे रेल्वे पोलीस घेत आहेत.
लोकलमधून प्रवास करणाऱ्या 31 वर्षीय जगन जंगले या तरुणाच्या हातावर गर्दूल्ल्याने लाकडी दांड्याने फटका मारल्याने तो लोकल मधून खाली पडून गंभीर जखमी झाला. या घटनेत जगन जंगले या रेल्वे प्रवशाला आपले दोन्ही पाय गमवावे लागलेत.
दादरमधील मॅजेस्टिक बुक स्टॉल येथे कामाला असलेले जगन हे कल्याण येथील रहिवासी आहेत. तीन महिन्यांपूर्वीच जगन यांचे लग्न झाले. नेहमीप्रमाणे जगन यांनी 22 मे रोजी कल्याणला जाणारी लोकल रात्री साडेआठच्या सुमारास दादर स्थानकातून पकडली.
ठाणे स्थानकातून लोकल निघाल्यानंतर कळवा-ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान लोकल आल्यानंतर, दरवाजात उभे असलेल्या जगन यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्यासाठी एका गर्दुल्याने त्यांच्या डाव्या हातावर लाकडी दांडक्याने फटका मारला. यात तोल गेल्याने जगन हे फलाट क्रमांक दोनपासून 200 मीटर पुढे लोकलमधून खाली पडले. त्याचवेळी त्यांचा मोबाइलही गहाळ झाला.
या घटनेमध्ये जगन यांच्या दोन्ही पायांवरून लोकलचे चाक गेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना रेल्वे पोलिसांसह काही प्रवाशांच्या मदतीने तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पायावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने त्यांना ठाण्यातील ढोकाळी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ठाण्यातील रुग्णालयात जगन जंगले यांचे दोन्ही पाय शस्त्रक्रिया करून कापावे लागले. या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, जगन हे नेमके कसे पडले, त्यांना कोणी पाडले, त्यांचा मोबाइल कोणी हिसकावला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
मी आयुष्यात उभा राहू शकणार नाही
या घटनेनंतर खंत व्यक्त करताना जगन जंगले म्हणाले की, माझ्या हातावर काठीचा फटका पडला आणि मी लोकलमधून खाली पडलो. माझ्यासोबत काय घडलं आहे ते काही काळ मला समजलचं नाही. मी वाचवा वाचवा ओरडत होतो, लोक मदतीला आले आणि मला रुग्णालयात दाखल केलं. पायावरून लोकल गेली आणि दोन्ही पाय गमावल्याचं डॉक्टरांनी मला सांगितलं. यापुढे मी कधीच उभा सुद्धा राहू शकत नाही.
जगन हा त्याच्या कुटुंबातील एकुलता एक कमवणारा आहे. त्याचे आई वडील शेतकरी आहेत. घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. जगन यांचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. सुदैवाने या अपघातात त्यांचा जीव वाचला असला तरी त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडून कठोर कारवाईची, तसेच रुग्णालयीन खर्च व रेल्वे प्रशासनाने भरपाई द्यावी अशी मागणी आता जगनचे नातेवाईक करत आहेत.
अशा परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचवणे सर्वात महत्त्वाचे असते. हा रुग्ण आमच्याकडे आला तेव्हा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्याला 3 ते 4 बाटल्या रक्त चढविण्यात आले. त्यांनतर आमची टीम त्याची प्रकृती नियंत्रणात आणण्यासाठी रात्रभर प्रयत्न करत होती. त्याचे दोन्ही पाय कापावे लागले असून यापुढे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. यासाठी मोठा खर्च येणार असल्याच डॉक्टरांनी सांगितलं आहे.
ही बातमी वाचा :