पिसाळलेल्या कुत्र्याला मारताना आजोबाचा नेम चुकला, बंदुकीच्या गोळीने नातू जखमी
महाड येथे 31 वर्षीय तरुण बंदुकीची गोळी लागल्याने जखमी झाला आहे. पिसाळलेल्या कुत्र्याला मारताना आजोबाचा नेम चुकल्याने ही घटना घडली.
रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याला मारताना नातवाच्या कमरेला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. कविराज साळवी या 31 वर्षीय तरुणाच्या कमरेला ही गोळी घासून गेल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाड तालुक्यातील कोकरे गावातील एक कुत्रा पिसाळला असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. या पिसाळलेल्या कुत्र्याला मारण्यासाठी गावकऱ्यांनी विविध प्रकारचे प्रयत्न केले. परंतु, हा कुत्रा प्रत्येक वेळेस बचावला. याचदरम्यान, गावातील सेवानिवृत्त सैनिक असलेले यशवंत साळवी यांनी आपली नळीची बंदूक घेऊन या पिसाळलेल्या कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी, कुत्र्यावर बंदुकीने नेम धरला आणि तेवढ्यात कुत्रा पसार झाला.
दरम्याने बंदुकीतून निघालेली ही गोळी त्यांचा नातू कविराज साळवीला लागली. त्यात कविराज हा जखमी झाला. सुदैवाने बंदुकीतून सुटलेली गोळी कविराज याच्या कमरेला घासून गेली. कविराज हा साळवी यांचा नातू असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत.
तर, यासंदर्भात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आजोबांविरोधात आपली कोणतीही तक्रार नसल्याचे कविराज याचे म्हणणे आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून कविराज याचे प्राण वाचले आहेत.