अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूरच्या रस्त्यांवर गॅंगवॉर? अवैध दारूच्या वादातून दोघांची हत्या
Nagpur : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्य सरकार नागपुरात आहे. अधिवेशन सुरक्षित दृष्ट्या पार पडावा यासाठी हजारो पोलिसांची तैनाती नागपूरच्या विविध रस्त्यांवर करण्यात आली आहे.
Nagpur : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्य सरकार नागपुरात आहे. अधिवेशन सुरक्षित दृष्ट्या पार पडावा यासाठी हजारो पोलिसांची तैनाती नागपूरच्या विविध रस्त्यांवर करण्यात आली आहे. असे असतानाही गुंडांना मात्र पोलिसांची थोडीही भीती नाही. कारण आज नागपूरच्या रस्त्यांवर गुंडांमध्ये गँगवॉर झाल्याचे दिसून आले. अवैध दारूच्या वादातून नागपूर अमरावती महामार्गावर वडधामना येथे दोघांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. योगेश मेश्राम आणि महेश गजभिये, असे मृतकांचे नाव असून दोघेही दारूचा अवैध व्यवसाय करायचे.
मिळालेल्या माहितीनुसार, दारूच्या अवैध व्यवसायात स्पर्धक टोळीच्या अब्बास नावाच्या गुंडाने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आज सकाळी योगेश आणि महेशला अमरावती महामार्गावर गाठले. त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. जेव्हा दोघेही जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळले. तेव्हा अब्बास टोळीच्या गुंडांनी तीक्ष्ण हत्याराने वार करत योगेश आणि महेशची हत्या केली. विशेष म्हणजे जेव्हा ही हत्या झाली तेव्हाही योगेश आणि महेश काळ्या रंगाच्या एका बॅगमध्ये अवैधरित्या दारू नागपुरात घेऊन येत होते. हत्येनंतर सर्व आरोपी तिथून पसार झाले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. दोन्ही मृतक तसेच अब्बास टोळीविरोधात अवैध दारू संदर्भातले अनेक गुन्हे दाखल असून अवैध दारूच्या व्यवसायातील स्पर्धेतूनच हे दुहेरी हत्याकांड झाले आहे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
काही प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या दाव्यानुसार, घटनेच्या वेळेला दोन्ही मृतक गोंडखैरी परिसरातून त्यांच्या बाईकवर नागपूरच्या दिशेने येत होते. तर एका कारमध्ये हल्लेखोर महामार्गावर रॉंग साईडने त्यांच्या विरुद्ध दिशेने येत होते. हल्लेखोरांनी आधी मृतांच्या बाईकला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर धारदार शस्स्त्राने त्यांच्यावर सपासप वार करत दोघांचा जीव घेतला. अवघ्या दोन ते तीन मिनिटात दोघांची हत्या करून हल्लेखोर त्याच कारने तिथून फरार झाले. दरम्यान, वर्ष 2022 मध्ये आधीच्या वर्षांच्या तुलनेत नागपुरात हत्येच्या घटना कमी झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असताना संपूर्ण राज्य सरकार नागपुरात असताना आणि हजारो पोलीस सुरक्षेच्या नावाखाली रस्त्यावर असताना असा गॅंगवॉर होणे पोलिसांच्या दाव्याची पोलखोल करणारं आहे.
इतर महत्वाची बातमी: