धन-दौलत अन् सुखाच्या बतावण्या करुन मांडूळ सापांची विक्री करणारी टोळी जेरबंद; सांगली पोलिसांची कारवाई
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ शहराजवळ दुर्मिळ जातीच्या मांडूळ सापाची विक्री करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कवठेमहांकाळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
सांगली : जिल्ह्याच्या कवठेमहांकाळमध्ये दुर्मिळ मांडूळ जातीचे साप विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. या मांडुळाची तस्करी करत असल्याप्रकरणी सहा जणांना अटक करत त्यांच्याकडून तीन मांडूळ साप जप्त करण्यात आले आहेत. धन-दौलत आणि ऐश्वर्य मिळेल अशी बतावणी करून या मांडूळ सापाची विक्री या टोळीकडून करण्यात येत होती. मात्र पोलिसांना या सौद्याची वेळीच माहिती मिळाली आणि छापा टाकत पोलिसांनी ही कारवाई केली.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ शहराजवळ दुर्मिळ जातीच्या मांडूळ सापाची विक्री करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कवठेमहांकाळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापांची विक्री करणाऱ्या सहा जणांना याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. यावेळी या टोळीकडून 3 दुर्मिळ असणारे मांडूळ जातीचे साप जप्त करण्यात आले आहेत. यातील एकाची किंमत अंदाजे 25 लाख इतकी असल्याचं समोर आलं आहे. तीन मांडुळ सापांची मिळून 60 लाख रुपयांना विक्री होणार होती, अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.
दुर्मिळ जातीच्या मांडूळ सापांमुळे धन-दौलत मिळते, अशी बतावणी करून लोकांची फसवणूक करत विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कवठेमहांकाळ येथील मेघराज मंदीर याठिकाणी सापळा रचला. त्याठिकाणी मांडूळ साप विक्रीसाठी आलेल्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातील दुर्मिळ मांडूळ जातीचे साप जप्त करण्यात आलेल्या आहेत,तर सहा जणांच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये वन कायद्या अंतर्गत अवैधरित्या साप बाळगणे व तसेच लोकांची फसवणूक करण्याचा उद्देश असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :