(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crime: इंस्टाग्रामवर ओळख वाढवायचा, भेटायला बोलावून राईडच्या बहाण्यानं बाईक चोरायचा, डोंबिवली पोलिसांनी 'असं' पकडलं...
Dombivali Crime: सोशल मीडियाच्या आधारे दुचाकी चोरीची शक्कल या चोरानं लढवली आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सराईत दुचाकी चोरट्याला डोंबिवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Dombivali Crime: आपण सातत्यानं सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर फसवणूक झाल्याचे किस्से ऐकतो, वाचतो. मात्र कितीही जनजागृती केली तरी असे प्रकार थांबायचं नाव घेत नाहीयेत. सोशल मीडियावरील (Instagram) मैत्री अनेकदा महागात पडल्याचं समोर आलं आहे. अशीच एक घटना डोंबिवलीत (Bombivali News) घडली आहे. इंस्टाग्रामवर ओळख वाढवत भेटण्यास बोलवून राईडच्या बहाण्याने महागडी बाईक चोरून पसार झालेल्या चोरट्याला डोंबिवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अनिकेत वटकर असे या चोरट्याचे नाव असून तो सराईत बाईक चोर असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
अनिकेत विरोधात डोंबिवली, मानपाडा, ठाण्यातील कोपरी, कापूरबावडी पोलीस ठाण्यात बाईक चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच त्याने आणखी काही दुचाकीने चोरी केल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस त्या दृष्टीने पुढील तपास करत आहेत. याआधी अनिकेत रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या गाड्या चोरी करायचा. यावेळी मात्र त्याने ही नवीन शक्कल लढवली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
राईडच्या बहाण्याने दुचाकी मागितली आणि पसार झाला
अनिकेतनं डोंबिवली पश्चिममध्ये राहणाऱ्या एका तरुणाची इंस्टाग्रामद्वारे ओळख वाढवून त्याला भेटण्यासाठी बोलावले. तक्रारदार तरुणाची दुचाकी त्यांनी राईडच्या बहाण्याने मागितली आणि दुचाकी घेऊन तिथून पसार झाला. बराच कालावधी उलटून चोरटा परत न आल्याने या तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्याने याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुऱ्हाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, पोलीस हवालदार विशाल वाघ यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.
परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपीची ओळख पटवली. सदर आरोपी हा कल्याण पश्चिम भागात फिरत असल्याची माहिती मिळत असताना त्यांच्या पथकाने सापळा रचत या आरोपी अनिकेतला ताब्यात घेतले. तपासा दरम्यान अनिकेत सराईत चोरटा असल्याचे समोर आले. अनिकेत विरोधात डोंबिवली ,मानपाडा कोपरी , कापूरबावडी या पोलिस ठाण्यात एकूण चार गुन्हे दाखल असल्याची माहिती आतापर्यंत समोर आली. तसेच त्यांनी आणखी काही दुचाकी देखील चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे. अनिकेत हा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी चोरी करायचा. आता मात्र त्यानं हायटेक पद्धत वापरली आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
आपणही सोशल मीडियावरील ओळखीच्या आधारे कुणावर किती विश्वास ठेवायचा याचा बोध यातून घ्यायला हवा.
ही बातमी देखील वाचा