Dharashiv : 1200 सिलेंडरचा घोळ, सात लाखांची ब्लॅकने विक्री; तणावाखाली आलेल्या वितरकाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, धाराशिवमध्ये खळबळ
Dharashiv Crime : धाराशिवमध्ये आधीच गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याचं चित्र आहे, त्यातच आता वितरकाने तणावाखाली येऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

धाराशिव : गॅसच्या स्टॉक आणि वितरणामध्ये तफावत असल्याने तणावाखाली आलेल्या गॅस वितरकाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली. ज्ञानेश्वर माळी असं गॅस वितरकाचं नाव असून कंपनीच्या तपासणीनंतर तो तणावाखाली होता. या वितरकाने 1200 सिलेंडरचा घोळ घातल्याचं आणि तब्बल सात लाख किमतीच्या सिलेंडरची ब्लॅकने विक्री केल्याची चर्चा आहे. गॅस वितरकावर सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे.
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील डीलर ज्ञानेश्वर माळी याने तणावाखाली असल्याने हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. गॅस कंपनीने त्याच्या एजन्सीची तपासणी केली होती. त्यामध्ये कंपनीला स्टॉक आणि वितरणामध्ये मोठी तफावत असल्याची माहिती समोर आली. गेल्या अनेक दिवसापासून या गॅस वितरकाकडे रिकव्हरी असल्याने त्याचा पुरवठाही बंद होता अशी माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी तामलवाडी पोलीस दाखल झाले असून त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. सध्या धाराशिव जिल्ह्यात आखाती युद्धामुळे गॅस टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यात डीलरने कंपनीच्या बैठकीत जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे.
नागपूरमध्ये सिलेंडर पळवले
नागपूरच्या जरीपटका भागात एका गॅस एजन्सीबाहेर सिलेडर घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. खूप वेळापासून रांगेत उभं असूनही सिलेडरचं वितरण केलं जात नव्हतं, म्हणून संतापलेल्या नागरिकांनी गॅस सिलिंडर घेऊन पळ काढला. मात्र थोड्याच वेळात पोलीस आले आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर नागरिकांनीही सिलेडर परत आणून दिले.
यवतमाळमध्ये नागरिकांना मनस्ताप
यवतमाळच्या दारव्हामध्ये ग्रामीण भागात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. भर उन्हात नागरिक रांगा लावत आहे. मात्र तासनतास थांबूनही गॅस मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एजन्सीकडे तुलनेने कमी सिलिंडर येत असले तरी, व्यवस्थित वितरण झाल्यास ग्राहकांना होणारा त्रास कमी होऊ शकतो. मात्र नियोजनाचा अभाव असल्याने सिलिंडर तर मिळतच नाही, उलट मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बीडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई
बीडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. गेवराईतील ग्रामीण भागात गॅस एजन्सी उघडण्यापूर्वीच नागरिकांनी सिलेंडरच्या रांगा लावल्याचं दिसून आलं. सिलेंडरच्या होणाऱ्या काळा बाजारामुळे नागरिकांना सिलेंडर मिळण्यास अडथळे निर्माण होत आहे. परस्पर ओटीपी मिळवून सिलेंडर विक्रीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे गॅस टंचाई निर्माण होत आहे. या सर्व बाबीचे नियोजन करावे अशी मागणी नागरिकांची आहे.
ही बातमी वाचा:






















