Crime News: प्रेयसीच्या महागड्या मोबाईलचं कर्ज फेडण्यासाठी स्वत: च्या अपहरणाचा बनाव, तरुणाला अटक
Crime News: प्रेयसीसाठी घेतलेल्या महागड्या फोनचे कर्ज फेडण्यासाठी स्वत: च्या अपहरणाचा बनाव रचणे एका तरुणाला महागात पडले.
Crime News : प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात. मात्र, एका प्रियकराला आपल्या प्रेमासाठी थेट तुरुंगात जावं लागलं आहे. प्रेयसीला घेऊन दिलेल्या महागड्या मोबाईलचं कर्ज फेडण्यासाठी एका तरुणाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे कर्नाटकातून या 20 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा बनाव समोर आला.
उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरातील जयश्री टिंबर ट्रेडिंग कंपनीत सोनू हरिराम भारती हे काम करतात. त्यांचा पुतण्या विजयकुमार चंद्रभान भारती (वय 20) हा 14 ऑगस्टला रात्री साडेदहाच्या सुमारास चिकन आणण्यासाठी गेला. मात्र रात्री उशीरापर्यंत तो घरी आला नाही. त्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास विजयकुमार याचे वडील चंद्रभान भारती यांना अज्ञात इसमाने मोबाईलवरुन फोन करून "विजय तुम्हारा कौन है? उसकी सलामती चाहते हो, तो 2 लाख रूपये दो, नही तो उसे मार दूंगा! और जल्दीसे पैसे का इंजताम करो, नही तो उसे मार दूंगा! और इस बारे में पुलिस को पता नही चलना चाहिए!" अशी धमकी देत दोन लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर कोकरे यांनी तपासाची सूत्रं हाती घेतली. त्यांनी तांत्रिक तपास करून अपहृत तरुणाचं लोकेशन मिळवलं. हे लोकेशन उद्यान एक्स्प्रेसने बंगळुरूच्या दिशेनं जात असल्याचं समजताच कर्नाटक रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून त्यांना विजयचा फोटो पाठवण्यात आला. मात्र त्यांना विजय सापडला नाही.
त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे विजयकुमार याला बुधवारी कर्नाटकच्या रायचूर रेल्वे स्टेशनवर रायचूरचे पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी त्याचं अपहरण झालेलं नसून हा सगळा बनाव असल्याचं पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार मध्यवर्ती पोलिसांनी रायचूर गाठत विजयचा ताबा घेऊन त्याला उल्हासनगरला आणले. विजयकुमार याने प्रेयसीला कर्ज काढून महागडा मोबाईल घेऊन दिला होता. मात्र हे कर्ज फेडण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्यानं त्यानं स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला असल्याची कबूली दिली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.
अपरहरण आणि खंडणीच्या प्रकारामुळे सुरुवातीला पोलिसही धास्तावले होते. या तरुणाची सुटका करण्यासाठी पोलिसांनी मोठी यंत्रणा कामाला लावली होती. मात्र अखेर हा बनाव असल्याचं समोर आल्यानं पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: