शॉकींग! 2 विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकास गजाने मारहाण; परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ
सध्या औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाच्या बीएससीच्या परीक्षा सुरू आहेत. श्रीपतवाडी येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये वाद झाला
बीड : दहावी किंवा बारावी बोर्ड परीक्षांच्या काळात परीक्षा (Exam) केंद्रावरील कॉपी आणि वाद आता साधारण बाब झाली आहे. मात्र, विद्यापीठाच्या पदवी परीक्षांमध्येही शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये वादाची भीषण घटना घडली आहे. बीडच्या (Beed) शिरूर तालुक्यातील श्रीपत वाडी येथे भगवान बाबा महाविद्यालयात दोन विद्यार्थ्यांनी चक्क प्राध्यापकाला गजाने मारहाण केल्यामुळे परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला होता. विद्यार्थ्यांकडून गजाने मारहाण झाल्याने परीक्षा केंद्रावरील इतर शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी, पोलिसांनाही (Police) कळवण्यात आले आहे.
सध्या औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाच्या बीएससीच्या परीक्षा सुरू आहेत. श्रीपतवाडी येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये वाद झाला. परीक्षेची प्रश्नपत्रिका का दिली नाही म्हणून दोन विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाला चक्क गजाने मारहाण केली. या घटनेत प्राध्यापक गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. याप्रकरणी, मारहाण करणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांवर शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांकडून अशारितीने शिक्षकांना मारहाण होत असेल तर परीक्षा घ्यायच्या कशा, असा सवालही संतप्त शिक्षकांनी विचारला आहे.
भगवान बाबा महाविद्यालयामध्ये प्राध्यापक अशोक वारे हे परीक्षा केंद्रावर असताना राहुल गर्जे आणि गंगाधर गर्जे या दोन विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका का दिली नाही म्हणून प्रा. अशोक वारे यांना गजाने मारहाण केली. या मारहाणीत अशोक वारे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना शिरोळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून मारहाण करणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनीही तत्काळ या घटनेची गंभीरतेने दखल घेत विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.