महावितरणच्या कार्यालयातच घेतली 1 लाखाची लाच, दोन अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले, छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
कामाचा प्रस्ताव मंजूर करतो म्हणून महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांनी मागितली लाच, छत्रपती संभाजीनगरच्या लाज लुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
Chhatrapati Sambhajinagar: कामाचा प्रस्ताव मंजूर करतो असे सांगत एक लाखाची लाच घेणाऱ्या महावितरणच्या (Mahavitaran) दोन अधिकाऱ्यांना छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti corruption department) रंगेहात पकडले आहे. याबाबत कन्नड पोलीस ठाण्यात आज त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचरकमेसह दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
कार्यकारी अभियंता धनाजी रामगुडे आणि उपव्यवस्थापक प्रवीण दिवेकर असे लाच घेणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत.
महावितरणच्या कार्यालयातच घेतली लाच
छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड महावितरण कार्यालयातच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून वर्ग १ व वर्ग २च्या अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याने महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यातील धनाजी रघुनाथ रामुगडे महावितरणचे वर्ग एकचे नोकरदार असून कार्यकारी अभियंता आहेत. तर प्रवीण दिवेकर हे महावितरणचे उपव्यवस्थापक असून वर्ग २ चे अधिकारी आहेत. आज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कन्नड विभागाच्या कार्यालयात लाच घेतल्याचा प्रकार रंगेहात पकडला गेला.
साडेतीन लाखांची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा
महावितरणकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराकडे या अधिकाऱ्यांनी साडेतीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यापूर्वी देखील तक्रारदाराकडून त्यांनी दीड लाख रुपयांची लाच घेतली होती. लाच घेणाऱ्या महावितरणच्या दोन्ही अधिकाऱ्यांवर कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी लाच रकमेसह पोलिसांच्या ताब्यात
कन्नड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महावितरणच्या कन्नड कार्यालयातच आरोपींनी तक्रारदाराकडे साडेतीन लाख रुपयांची लाच मागितली. यापूर्वीच त्यांनी दीड लाख रुपये त्यांच्याकडून घेतले असून उर्वरित दोन लाखांपैकी तडजोड करून एक लाख रुपये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले. आरोपी रामगुडे व दिवेकर यांना कार्यालयातच लाच घेताना छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या दोन्ही आरोपींना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा:
फार्म हाऊसमध्ये गंभीर गुन्ह्यातील आरोपींना आश्रय, पाच जणांवर गुन्हा दाखल; तिघांना बेड्या