(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News: सुसंस्कृत पुण्यात पोलीसच असुरक्षित? गाडी अडवली म्हणून संतापलेल्या दोघांची पोलिसाला जबर मारहाण
Pune Crime : पोलीस, हे नाव ऐकल्यावर अगदी भल्या भल्या लोकांना घाम फुटतो. मात्र, याच खाकीची आता पुण्यात भीती उरली नाही की काय असा प्रश्न समोर आलाय.
Pune News: पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात (Pune Crime) नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणेकर (Pune News) सोडाच पण पुण्याती पोलीस तरी सुरक्षीत आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी चेक पॉईंटवर चेकींग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर पेट्रोल (Petrol) ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला होता. अशातच आता चेक पॉईंटवर गाडी अडवल्याचा राग आल्यानं नोकरी कशी करतोस, तेच बघतोच, असं म्हणत थेट पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पुणं सुरक्षित तर आहे ना? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय.
पोलीस, हे नाव ऐकल्यावर अगदी भल्या भल्या लोकांना घाम फुटतो. मात्र, याच खाकीची आता पुण्यात भीती उरली नाही की काय असा प्रश्न समोर आलाय. पुण्यात एकीकडे ड्रग्सची विक्री, वाढणारे अपघात, कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सुरू आहेत. पुणे पोलीस अथक परिश्रम घेऊन शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा कसा घालता येईल हे बघतायत. मात्र दुसऱ्या बाजूला, याच पोलिसांवर सातत्यानं हल्ले होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात वाहतूकीचे नियमन करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यासह हवालदारावर एकाकडून पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला. त्या घटनेला अजून महिनाही उलटला नाही, तोच सिंहगड रस्त्यावर पोलीस अंमलदाराला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील धायरी शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी फाटा येथे दोन जणांनी ड्युटीवर असलेल्या पोलिसालाच मारहाण केली आहे. समाजाचे रक्षक असलेल्या पोलिसांवरच हल्ले वाढल्यानं नागरिकही धास्तावले आहेत. याप्रकरणी मंगेश शिवाजी फडके आणि बापू रोहिदास दळवी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 121 (1), 132, 351 (2), 351 (3), 352 नुसार हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं घडलं काय?
सिंहगड रस्त्यावर रविवारी वाहतूक हटविण्यासाठी पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड गेले असता, त्यांच्याशी दोघांनी बाचाबाची केली. मी कोण आहे? तुला माहीत नाही? तू नोकरी कशी करतो तेच बघतो, असं म्हणत पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड यांना मारहाण सुरू केली. त्यानंतर दुसरे अंमलदार मदतीसाठी गेले असता, त्यांनादेखील मारहाण केली. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.