Nashik News : फडणवीसांना काळे झेंडे दाखविणाऱ्यांवर गुन्हा दाखल, पोलिसांकडून धरपकड
Nashik News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी नाशिक दौऱ्यावर आले होते. नाशिकमध्ये त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik News नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे शनिवारी विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी नाशिक दौऱ्यावर आले होते. 34 व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप करून देवेंद्र फडणवीस हे सातपूर पोलीस ठाण्याच्या (Satpur Police Station) नवीन इमारतीच्या उद्घाटनाला जाताना त्यांना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते. याप्रकरणी चार जणांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फडणवीस हे शनिवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. महाराष्ट्र पोलीस अकादमीत राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांच्या समारोपाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांचा ताफा त्र्यंबकरोडवरून जाताना रस्त्यालगतच्या गर्दीतून अचानक जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयेश पोकळे यांच्यासह पदाधिकारी आले. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) काळात कामे होत नाही. गुन्हेगारी वाढली आहे, अशा कारणांवरून काळे झेंडे दाखवण्यात आले.
पोलिसांकडून संशयितांची धरपकड
यामुळे चौकात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची एकच धावपळ उडाल्याचे दिसून आले. पोलिसांनी संबंधिताच्या हातातील काळे झेंडे हिसकावून घेत त्यांची धरपकड करीत ताब्यात घेतले. याप्रकरणी जयेश रमेश पोकळे, सागर रंगनाथ पिंपळके, पंकज सुधाकर सोनवणे, महेश रतन देवरे आणि एका विरोधात गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांना नोटीस बजावून सोडून देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
नाशिकचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील
दरम्यान, नाशिक येथील मेळा बसस्थानकाच्या उद्घाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाशिक शहर हे विकासासाठी दत्तक आहे. त्यामुळे आगामी काळात नाशिक शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली तपोभूमी आणि स्वातंत्र्यवीर सावरकारांच्या ज्वाजल्य विचारांची भूमी म्हणून नाशिकची ओळख आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या माध्यमातून एक आधुनिक शहर म्हणून नाशिकची ओळख निर्माण होण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
नाशिक - पुणे फास्ट रेल्वेमार्गासाठी केंद्राकडे पाठपुरावा
रिंगरोड हा शहराच्या विकासाचे केंद्र मानले जाते. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात नियोजित असलेल्या रिंगरोड काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच नाशिक पुणे फास्ट रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. यासोबतच नाशिक शहरासाठी निओ मेट्रोचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे.
आणखी वाचा