Buldhana : लग्नात सूत्रसंचालन करताना नाव न घेतल्यामुळं शिवसेना नेत्याची दादागिरी; पत्रकाराच्या घरावर हल्ला
Buldhana Crime News : बुलढाण्यामध्ये लग्नात सूत्रसंचालन करणे पत्रकाराला महागात पडलं आहे. सूत्रसंचालन करताना नाव घेतलं नाही म्हणून शिवसेना नेत्यानं सूत्रसंचालन करणाऱ्या पत्रकाराच्या घरावर हल्ला केलाय

Buldhana Crime News : कुणाला कधी आणि कशाचा राग येईल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना बुलढाण्यात समोर आली आहे. एका लग्न समारोहात आपलं नाव का घेतलं नाही याचा राग आलेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यानं लग्नामध्ये सूत्रसंचालन करणाऱ्या पत्रकाराच्या घरावर हल्ला केल्यानं खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील मोताळा येथील एका लग्नकार्यात संचालनादरम्यान आपले नाव न घेतल्यामुळे चिडलेल्या स्थानिक शिवसेना नेत्याने (shiv sena Leader) रात्री सूत्रसंचालकाच्या घरावरच प्राणघातक हल्ला केला. मोताळा येथील माळी कुटुंबात काल लग्न होतं. लग्नाचे सूत्रसंचालन स्थानिक पत्रकार गणेश झंवर यांच्याकडे होते. सत्कार तथा आलेल्या मान्यवरांचा नामोल्लेख करतांना झंवर यांच्याकडून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले शरद पाटील यांचा उल्लेख अनावधानाने राहून गेला.
परंतु पाटील यांना या गोष्टीचा इतका राग आला की, त्यांनी लग्नमंडपातच गणेश झंवर यांना 'पाहून घेण्याची' धमकी दिली. त्यानंतर लग्न सोहळा आटोपून गणेश झंवर हे घरी परतले. ते घरी आल्यावर शरद पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी गणेश झंवर यांच्या घरावरच हल्ला केला.
लोखंडी रॉड तथा शस्त्रे घेऊन पाटील पिता-पुत्राने झंवर यांच्या कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात सूत्रसंचालन करणारे पत्रकार गणेश झंवर आणि त्यांच्या पत्नी अनिता झंवर यांच्यासह झंवर परिवारातील धनराज, वैभव, विवेक झंवर हे जखमी झाले आहेत. झंवर कुटुंबाने बोराखेडी पोलिसांमध्ये या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
