Thane : बलात्कार करून अल्पवयीन मुलीची हत्या, नराधमाला फाशी, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Thane Court : भिवंडीत आईस्क्रीमचे आमिष दाखवत सात वर्षीय बालिकेचे अपहरण करून, त्यानंतर तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचुन निर्घृण हत्या करण्यात आली होती.
District & Sessions Court, Thane : बलात्कार करणाऱ्या नराधमाला फक्त फाशीचीच शिक्षा योग्य आहे. त्यात एका निरागस लहान मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला तर दया दाखवूच नये अशी आपली इच्छा असते. ठाणे जिल्हा न्यायालयाने ही इच्छा सत्यात उतरवून पीडित मुलीच्या नातेवाईकांना न्याय दिला आहे. भिवंडीत आईस्क्रीमचे आमिष दाखवत सात वर्षीय बालिकेचे अपहरण करून, त्यानंतर तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी भरतकुमार धनीराम कोरी (30) याला ठाणे जिल्हा व सत्र विशेष पोस्को न्यायालयाच्या न्यायाधीश के डी शिरभाते यांनी साक्षी पुरावे ग्राहय मानून 18 एप्रिल रोजी दोषी ठरवले. तसेच त्याला बुधवारी फाशीची सुनावली. ही घटना भिवंडीत 21 डिसेंबर 2019 मध्ये घडली होती. या खटल्यात सरकारी वकील म्हणून संजय मोरे यांनी काम पाहिले.
हमाली करणारा आरोपी कोरी हा भिवंडीतील रहिवासी आहे. तो मयत व पीडित मुलीला ओळखत होता. त्यातच त्याने पीडित मुलीला आईस्क्रीमचे आमिष दाखवत तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर, झालेला प्रकार तिने कोणाला सांगू नये, यासाठी तिच्या डोक्यात दोन वेळा मोठी दगड टाकत तिच्या हत्या केली. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात भादवी कलम 364,376, 376(एबी), 376 (डीबी), 302 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 8, 9 (ह), 10, 12 अन्वये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. हा खटला विशेष पोस्को न्यायालयाच्या न्यायाधीश के डी शिरभाते यांच्या समोर आल्यावर सरकारी वकील संजय मोरे यांनी सादर केले 25 साक्षीदार आणि सादर केलेले पुरावे याच्या आधारे त्याला दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर त्याला भादवि कलम 302 प्रमाणे फाशी तसेच भादवि कलम 364 प्रमाणे जन्मठेप व 10 हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास 1 वर्ष सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. भादवि कलम 376 (अ) (ब) प्रमाणे फाशी, पोक्सो कलम 5 (एम) व 6 प्रमाणे फाशी अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी केला तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस शिपाई डी ए नोटेवाड आणि पोलीस हवालदार व्ही व्ही शेवाळे यांनी काम पाहिले.