(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Buldhana Crime : विहिरीतून निघाल्या डझनभर दुचाकी; बुलढाण्यात दुचाकी चोरांचा नवा फंडा, स्पेअरपार्ट काढून दुचाकी विहिरीत फेकायचे!
Buldhana Crime : खामगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने खामगाव शहर पोलिसांनी शेगावातून एका संशयिताला ताब्यात घेतलं होतं.
Buldhana Crime : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात एका विहिरीतून (Well) चक्क पाण्याऐवजी दुचाकींचा (Bike) खजिना मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दुचाकी चोरीच्या एका संशयित आरोपीची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. खामगाव (Khamgaon) शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने खामगाव शहर पोलिसांनी शेगावातून एका संशयिताला ताब्यात घेतलं होतं. त्याची पोलिसी खाक्यानुसार चौकशी केली असता त्याने अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. मात्र नंतर त्या दुचाकीचं काय केलं हे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.
हा दुचाकी चोर दुचाकी चोरुन तिचे फक्त चाक आणि बॅटरी काढून ते विकायचा. तर दुचाकी शेगाव-संग्रामपूर मार्गावरील विहिरीत टाकून द्यायचा. आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संग्रामपूर मार्गावरील दोन विहिरीतून सुमारे 12 दुचाकी बाहेर काढला असून अजूनही अनेक दुचाकी विहिरीत असून ते काढण्याचं काम पोलीस करत आहेत. मात्र आता विहिरीतून पाण्याऐवजी दुचाकी निघत असल्याने नागरिक मात्र या विहिरींभोवती बघायला गर्दी करत आहेत.
दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ
बुलढाणा जिल्ह्यात विशेषत: सरकारी कार्यालयं आणि गर्दीच्या ठिकाणी मागील काही दिवसांमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा या चोरीचा छडा लावण्याकरता कामाला लागली होती. दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात बुलडाणा पोलिसांना यश आलं. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी लंपास करणारी टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली. चोरटे स्पेअरपार्ट काढून दुचाकी विहिरीत फेकत होते. शेगाव रस्त्यावर विहिरीतून पोलिसांनी दुचाकी काढणं सुरु केलं आणि आतापर्यंत तब्बल 12 दुचाकी बाहेर काढण्यात आल्या आहेत.
चाक आणि बॅटरी काढून दुचाकी विहिरीत टाकायचे
सैय्यद वसिम सैय्यद इस्लाम (वय 38 वर्षे) असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नावं आहे. तो शेगावमधील ईदगाह प्लॉट परिसरात राहतो. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. परंतु पोलिसी खाक्या पाहताच त्याने बोलण्यास सुरुवात करत गुन्ह्यांची कबुली दिली. दुचाकी चोरांची टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे. ही टोळी काही भाग काढून दुचाकी विहिरात टाकायचे. चोरटे दुचाकी चोरुन तिचे फक्त चाक आणि बॅटरी काढून ते विकायचे. तर दुचाकी शेगाव-संग्रामपूर मार्गावरील विहिरीत टाकून द्यायचे.
VIDEO : Buldhana Bikes Theft : बुलढाण्यात चोरी केलेल्या दुचाकी विहिरीत फेकल्या, पोलिसांकडून दुचाकींचा उपसा