Bhiwandi Crime : भिवंडीत नकली बंदुकीने दहशत माजवण्याचा प्रयत्न; दोघांवर गुन्हा दाखल, बंदूकही केली जप्त
Bhiwandi Firing : जुन्या वादातून दोन तरूण एकमेकांशी भिडले आणि त्यानंतर एकाने एअरगनने हवेत गोळीबार केल्याची घटना भिवंडीत घडली.
ठाणे : सध्या राज्यात गोळीबाराच्या घटनेमुळे दहशतीचे वातावरण असतानाच भिवंडी शहरात नकली बंदुकीच्या माध्यमातून दहशत (Bhiwandi Firing) पसरवण्याचा प्रकार घडला आहे. ठाणगेआळी परिसरात दोघा तरुणांमध्ये एका जुन्या वादातून हाणामारी झाल्याच्या घटनेनंतर हवेत गोळीबार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या वेळी तरूणांकडून लगेचच बंदूक हिसकावून घेण्यात आली, मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलिसांनी दोन्ही गटाच्या तरुणांवर अदखल पात्र गुन्हा दाखल करत बंदूक जप्त केली. त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आले की ही बंदूक खरी नसून खोटी बंदूक (एअरगन) आहे. सध्या पोलिसांनी ही एअर गनदेखील जप्त केली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जुन्या वादातून हाणामारी
तुषार खाडेकर आणि नारायण भोइर यांच्यात जुना वाद असून नारायण भोईर यांचा पुतण्या उमेश भोईर आणि कृष्णा चव्हाण हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. भिवंडी शहरातील ठाणगेआळी परिसरात कृष्णा चव्हाण याने तुषार खाडेकर याने नारायण काका बरोबर तू का उगाच भांडण करतो? असा प्रश्न विचारला. यावरून कृष्णा आणि तुषार खाडेकर यांच्यात बाचाबाची होऊन भांडण सुरू झाले.
कृष्णा यांने मिखंज पटेल यास आपल्या मदतीसाठी बोलावले. त्यानंतर तुषार खाडेकर आणि मिखंज पटेल यांच्यात जोरदार हाणामारी झाली. मात्र यावेळी मिखंज पटेलच्या कमरेला बंदूक होती आणि त्याने बंदूक काढून हवेत फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे.
परिसरात भीतीचे वातावरण
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. परंतु ही बंदूक खरी नसून खेळण्यातील नकली एअरगन असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या पोलिसांनी तुषार खाडेकर आणि मिखंज पटेल या दोघांविरोधात परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हा दाखल करून ही नकली बंदूक जप्त केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगिरे करत आहेत.
ही बातमी वाचा: