Beed : गुन्ह्यात गुंतवण्याची भीती दाखवून एक कोटींची लाच मागितली, निलंबित इन्स्पेक्टर हरिभाऊ खाडेला 29 मे पर्यंत पोलिस कोठडी
Beed Corruption News : आरोपपत्रात नाव घालण्याची भीती दाखवून पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडेने दोन व्यावसायिकांकडून लाचेची मागणी केली होती.
बीड: जिजाऊ मल्टिस्टेटच्या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी एक कोटीची लाच मागणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षक हरीभाऊ खाडेला (Haribhau Khade) 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बीडच्या जिल्हा न्यायालयाचे जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी हे आदेश दिले आहेत. बीडमधील जिजाऊ मल्टिस्टेट सहकारी बँकेतील 100 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आरोपींच्या यादीत नाव समाविष्ट करण्याची भीती दाखवून दोन व्यावसायिकांकडून लाच उकळण्याचा प्रयत्न खाडेने केला होता.
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरीभाऊ खाडे याने बीडच्या जिजाऊ मल्टिस्टेट प्रकरणात कारवाई न करण्यासाठी एक कोटीची लाच मागितली होती. या प्रकरणी एसीबीने कारवाई करत त्याच्यावर गुन्हा केला होता. त्यानंतर खाडेला निलंबित करण्यात आलं होतं. निलंबित केल्यानंतर हरिभाऊ खाडे तब्बल आठ दिवस फरार होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी तो पोलिसांना शरण आला.
अटक केल्यानंतर पोलिसांनी हरिभाऊ खाडेला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केलं. यावेळी तपास अधिकारी पोलीस उपअधिक्षक शंकर शिंदे यांनी खाडेला सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. खाडेच्या घरुन रोकड, दागिने आणि खरेदी खत असे 2 कोटी 18 लाखाचे घबाड मिळाले असून त्याची चौकशी करणे आवश्यक असल्याचे एसीबीच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. यावर न्यायालयाने हरीभाऊ खाडेला 29 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमकं प्रकरण काय?
बीड शहरातील जिजाऊ मल्टीस्टेट सहकारी बँकेमध्ये गेल्यावर्षी 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. याप्रकरणात बँकेचे प्रमुख बबन शिंदे तसेच अध्यक्ष अनिता शिंदे यांच्यासह चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या हरिभाऊ खाडे यांच्याकडे होता. हा तपास सुरु असताना आरोपी बबन शिंदे यांनी दोन बांधकाम व्यावसायिकांना 60 लाख रुपये दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने आपला मोर्चा या दोन व्यावसायिकांकडे वळवला होता.
हरिभाऊ खाडे यांच्याकडे तपासाची सूत्रे होती. त्यांनी दोन्ही व्यावसायिकांना याप्रकरणात आरोपी करण्याची धमकी दिली. आरोपींच्या यादीत नाव येऊन द्यायचे नसेल तर दोघांनीही प्रत्येकी 50 लाख रुपये द्यावेत, असे खाडे यांनी सांगितले होते. चार महिने खाडे पैशांसाठी या दोघांच्या मागे लागले होते. अखेर या दोघांनी घासाघीस करुन प्रत्येकी 30 लाख रुपये देण्याचे कबूल केले. यानंतर एका व्यापाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून हरिभाऊ खाडेच्या एजंटला रंगेहात पकडलं होतं.
ही बातमी वाचा: