(Source: ECI/ABP News/ABP Majha)
"माझा बॉस मला सारखा चोर म्हणतोय, म्हणून मी स्वतःला संपवतोय..."; टचक्या-टोमण्यांना कंटाळून कर्मचाऱ्यानं आयुष्य संपवलं
Crime News: शोरूम बॉसनं दररोज चोर म्हणून हिणवल्यामुळं दुखावलेल्या कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली आणि यासाठी आपल्या बॉसला जबाबदार धरलं आहे.
Crime News Updates : मुंबई : बॉस आणि एम्प्लॉईच्या नात्याबाबत आपण सोशल मीडियावर अनेक मीम्स पाहतो. बॉसचे टोमणे, त्यावर एम्प्लॉईनं दिलेलं हटके उत्तर किंवा दुःखी झालेले एम्प्लॉई असे अनेक मीम्स दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, राजस्थानमध्ये घडलेल्या घटनेनं मात्र पूर्ण देश हादरला आहे.
राजस्थानमध्ये (Rajasthan) बॉसच्या टोमण्यांना कंटाळून कर्मचाऱ्यानं आपलं आयुष्य संपवलं आहे. राजस्थानमधील कोटा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शोरूम बॉसनं सतत चोर म्हणून हिणवल्यामुळे दुखावलेल्या कर्मचाऱ्यानं स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यानं आपल्या बॉसला जबाबदार धरलं आहे.
पत्नीच्या तक्रारीवरून शोरूम मालकावर गुन्हा दाखल
आत्महत्येपूर्वी कर्मचाऱ्यानं सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, "मालक मला सारखं सारखं चोर म्हणतो, त्यामुळेच मी आत्महत्या करत आहे," मृत कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आता शोरूमच्या मालकावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शोरूम मालकावर पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप महिलेनं केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालकाकडून वारंवार चोर म्हटल्यानं दुखावलेल्या विजयपाल सिंहनं आपल्या घरी जाऊन विष प्राशन केलं. त्यांची प्रकृती खालावल्यानं कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं, मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं. पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमार्टम करून कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. या एम्पॉईनं तीन दिवसांपूर्वी घरात विष प्राशन केलं होतं.
तब्बल 19 वर्षांपासून त्याच शोरुममध्ये काम करत होते विजयपाल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयपाल सिंह यांनी 4 सप्टेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी विष प्राशन केलं होतं. माहिती मिळताच पोलिसही 5 सप्टेंबरला तिथे गेले, मात्र ते बेशुद्ध पडले, त्यानंतर शनिवारी सकाळी विजयपाल सिंह यांचा मृत्यू झाला, मृतदेहाचं शवविच्छेदन करुन पोलिसांनी विजयपाल यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला आहे.
मृत इसमाच्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीवरुन शोरुमच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मृत व्यक्ती गेल्या 19 वर्षांपासून विजयपाल शोरूममध्ये काम करत होता. वर्षभरापूर्वी शोरूम ऑपरेटरच्या शोरूममध्ये चोरी झाली होती, त्यानंतर मालकाला चोरीचा संशय आला.
मालक सतत चोर म्हणायचा... दुखी झालेल्या कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊस
मृत्यूपूर्वी, विजयपालनं त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, माझा बॉस मला चोर समजतो आणि वारंवार चोर म्हणून हाक मारतो. पोलिसही सारखे मला पोलीस ठाण्यात बोलावून त्रास देतात. मी स्वतःच्या इच्छेनं आत्महत्या करत आहे. माझ्या कुटुंबाला कोणीही त्रास देऊ नये आणि माझ्या पत्नीला कार्यालयाकडून नक्कीच नुकसानभरपाई मिळावी, मी गेल्या एक वर्षापासून प्रचंड नैराश्यात आहे. त्यामुळेच मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतोय.