Akola : अकोल्यात वर्चस्वाच्या लढाईतून एकाची हत्या, मारेकरीही जखमी
Akola Crime: अकोला शहरातील न्यू तापडीया नगरात ही हत्येची घटना घडली असून आरोपी सुहास वाकोडे हा नावाजलेला गुंड असल्याची माहिती आहे.
अकोला : वर्चस्वाच्या वादातून अकोल्यात एकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेत मारोकरी आरोपीही जखमी झाला आहे. अकोला शहरातील न्यू तापडिया नगरमध्ये वर्चस्वाच्या वादातून चाकूने वार करत हे हत्याकांड घडले आहे. ही घटना शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात सिव्हिल पोलीस पुढील तपास करीत आहे. विनोद वामन ठोबरे असं या मृतक तीस वर्षीय युवकाचं नाव आहे. तो शहरालगतच्या खरप गावातील पंचशील नगरचा रहिवाशी आहे.
विनोद वामन ठोंबरे याच्यावर शनिवारी रात्री 10 वाजता हल्ला करुन हत्या करण्यात आली. तर हल्ला करणारा मारेकरी सुहास वाकोडे हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लवकरच पोलीस त्याला ताब्यात घेणार आहेत. अनेक दिवसांपासून मृतक विनोद आणि मारेकऱ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु होती, आज या लढाईचं रूपांतर हत्येमध्ये झालं. सुहासने विनोदच्या छातीवर आणि अंगावर चाकूने वार करीत त्याला गंभीर जखमी केले, त्यात त्याचा मृत्यु झाला.
अकोला शहरातील सिव्हिल पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू तापडिया नगरातील गणेश मंदिर जवळ हे हत्याकांड घडले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. सध्या मारेकरी जखमी असलेला सुहास वाकोडे याच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर अकोला शहरात चांगलीचं खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेत किती मारेकऱ्यांचा समावेश आहे याचाही तपास पोलीस करत आहेत. तरीही हत्येचं नेमकं कारण अद्याप कळू शकले नाही.
आरोपी सुहास नावाजलेला गुंड
सुहास वाकोडेवर सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी अकोल्याचे पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी सुहासवर एमपीडीएनुसार कारवाई केली होती. या कारवाईत त्याला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. एमपीडीए अंतगर्त शिक्षा भोगून कारवाई पूर्ण झाल्यानंतर सुहास कारागृहातून सुटला होता.