(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crime News : नववीतील मुलाचे थरारक कृत्य, रागात आईलाच संपवले, अकोला हादरले
Crime News : पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असता, मृतक संगीता हिच्याच मुलाला चौकशीसाठी बोलावून विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्या आईची कट रचून हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं.
Akola Crime News : अकोला जिल्ह्यातील दहीगाव गावंडे शेतशिवारात आठवडाभरापूर्वी एका 40 वर्षीय विधवा महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या डोक्यावर अन् अंगावर ठिकठिकाणी दगडानं मारल्याच्या जखमा होत्या. अखेर या हत्या प्रकरणाचा अकोला पोलिसांनी उलगडा केला. या महिलेच्या हत्येमागे तिच्याच पोटच्या 15 वर्षीय मुलाचा हात असल्याचं समोर आलंय. या हत्या प्रकरणात हत्येचं मूळ कारण म्हणजेच खळबळजनक माहिती देखील समोर आली. मुलांनं पोलिसांना सांगितले की, त्याची आई त्याला अनेकदा ओरडायची, त्याच्यावर रागवायची. 4 जूनला दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यामुळे संतापाच्या भरात आईचा कट रचला अन् तिचा दगडानं ठेचून खून केला. संगीता राजू रवाळे (वय ४० वर्ष रा. ब्राम्हणवाडा जि. वाशीम ह.मु. दहीगाव गावंडे, अकोला) असं या मृत महिलेचं नाव आहे.
काय आहे नेमकं प्रकरण? :
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम दहीगाव गावंडे येथील मृतक संगीता राजु रवाळे (वय ४० वर्ष रा. ब्राम्हणवाडा जि. वाशीम ह.मु. दहीगाव गावंडे) हिच्या पतीचं निधन झालं असून, तिला दोन मुले आहेत. गेल्या तीन चार वर्षांपासून माहेरी म्हणजेच दहीगाव गावंडे इथे राहत होती. रविवार म्हणजे ४ जूनपासून संगिता ही गावातून बेपत्ता झाली होती. दरम्यान, गेल्या आठवड्यात मंगळवारी (६ जून) सायंकाळी दहीगाव गावंडे येथील शेतशिवारात एका खड्ड्यात तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेह काटेरी झुडुपात टाकलेला होता. मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने तिचा खून केल्याच समोर आलं होतंय. त्यानंतर या प्रकरणात बोरगाव म्हणजे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या हत्याचा तपास अकोला पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतल्यानंतर आज संपूर्ण हत्येचा उलगडा झाला. संगीता हिच्याच पंधरा वर्षे वयाच्या मुलानं तिची (आईची) हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गोपाल जाधव यांनी केला आहे.
आई रागावते म्हणून आईला संपवण्याचा रचला कट :
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असता, मृतक संगीता हिच्याच मुलाला चौकशीसाठी बोलावून विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्या आईची कट रचून हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं. त्याची आई त्याला अनेकदा ओरडायची, त्याच्यावर रागवायची. रागवायचं कारण म्हटल्या गेलं तर मारेकरी मुलांना शिक्षण सोडून दिलं, म्हणजेच शाळेत जाणे बंद केलं होतं. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी आई नेहमी त्याला रागवायची. हत्येच्या दिवशी देखील आई आणि मुलांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यामुळे संतापाच्या भरात त्यानं आईला संपवलं.
असा रचला आईच्या हत्येचा कट :
मृत संगीता ही कामासाठी पारसला रेल्वेने ये-जा करायची. दररोज प्रमाणे ४ जून रोजी देखील दहिगाव गावातुन शेत रस्ताने अन्वी मिर्झापुरमार्गे बोरगांव मंजू रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी निघाली होती. संगीता ही रस्त्याच्या मधोमध म्हणजेच सामसूम शेत रस्त्यात पोहोचली असता, तिच्याच मुलाने येथे येत दगडाने आईच्या डोक्यावर, तोंडावर व शरीरावर ठिकठिकाणी वार खून केला. हत्यानंतर मृतदेह कोणाला दिसुन येवु नये याकरीता रस्ताचे बाजुला असलेल्या नालीमध्ये टाकुन त्यावर काटेरी झुड़पे टाकुन झाकुन टाकले. पुढं ६ जून रोजी तिचा मृतदेह आढळून आला अन् संपूर्ण हत्याकांडाचा खुलासा झाला. पुढील तपास बोरगाव मंजू पोलिस स्टेशन संजय खंदाडे हे करीत आहे.