शॉकिंग! 2 महिन्यावर होतं मरियमचं लग्न, अज्ञाताचा घरात शिरुन ॲसिड हल्ला; मालेगाव हादरलं
पीडित कुटुंबीयांच्या घरात ॲसिड फेकल्यानंतर हल्लेखोराने काही वेळातच हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.
नाशिक : जिल्ह्याच्या मालेगाव शहरात खळबळजनक घटना घडली असून एका चक्क घरात झोपलेल्या मुलीच्या अंगावर अॅसिड हल्ला केल्याची उघडकीस आले आहे. शहरातील इस्लामाबाद भागात मंगळवारी रात्री उशीरा अज्ञात व्यक्तीने एकच कुटुंबातील तिघांवर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. मोहम्मद लुकमान व त्यांच्या पत्नी नूजहत परवीन (40) व मुलगी मरियम अहमद (18) हे तिघे मंगळवारी रात्री त्यांच्या घरात झोपलेले असताना अज्ञाताने घरात प्रवेश करत तिघांवर अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या मरियमचे 2 महिन्यानंतर लग्न ठरले होते, अशी माहिती आहे. त्यामुळे, या घटनेमागे माथेफिर एकतर्फी प्रेमाचा विषय आहे का, अशा अँगलने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पीडित कुटुंबीयांच्या घरात ॲसिड फेकल्यानंतर हल्लेखोराने काही वेळातच हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. झोपेत असताना अचानक ॲसिड हल्ला झाल्याने घरातील कुटुंबीयांनी मोठ्याने आरडाओरड केली. गल्लीत जोरदार ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यात मुलगी मरियम, लुकमान यांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी व माजी नगरसेवकांनी पीडित कुटुंबीयांकडे धाव घेतली. मोहम्मद लुकमान यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने अॅसिड फेकल्याने संपूर्ण घर धुराने भरले होते. दरम्यान, घटनेनंतर तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. साजीद अन्सारी व जावीद अब्दुल सत्तार यांनी तिघांना मालेगावातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, मरियम व लुकमान यांना अधिक उपचारासाठी डॉक्टरांनी धुळ्यातील रुग्णालयात पाठविले आहे. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत हल्लेखोराचा शोध घेतला जात होता.
दरम्यान, मालेगाव शहरात अॅसिड हल्ल्याची ही पहिलीच घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत किल्ला पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. मात्र, हल्ल्यातील जखमी मरियम हिचे लग्न जमले होते, 2 महिन्यानंतर तिचे लग्न होणार होते, पण तिच्यावर झालेल्या अॅसिड हल्ल्यामुळे पोलिसांनी त्या अँगलने तपास सुरू केला आहे.