धक्कादायक! अतिप्रसंगाला विरोध केल्याने 12 वर्षाच्या मुलीला धावत्या ट्रेनमधून फेकले
धावत्या ट्रेनमधून मुलीला बाहेर फेकून दिल्याचे त्या दुर्दैवी मुलीच्या पालकांनाही माहिती नव्हते. मात्र रेल्वे रुळावर बेशुध्द अवस्थेत पडलेली मुलगी शुध्दीवर आल्यावर हा सर्व प्रकार समोर आला.
सातारा : वास्को निजामुद्दीन एक्सप्रेसमध्ये अवघ्या बारा वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करुन तिला रेल्वेतून फेकून दिल्याची धक्कादायक घटना पहाटे घडली. दिल्ली येथे निघालेल्या पती-पत्नी आणि तीन लहान मुलींसह बदली झाल्यामुळे घरी जात असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. महत्त्वाचे म्हणजे यातील आरोपी हा सैनिक दलात कार्यरत आहे.
वास्को निजामुद्दीन एक्सप्रेसही आज पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान सातारा जिल्ह्याच्या हद्दीत आली असताना आरोपीने बारा वर्षाच्या चिमुकलीला झोपलेल्या अवस्थेत उचलून धावत्या रेल्वेतील बाथरुममध्ये नेले. दरम्यान या मुलीसोबत या नराधमाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा करायला सुरुवात केली. नंतर तीने दरवाजावरही लाथा मारल्या. त्यानंतर त्या आरोपीने तिला तुला आई वडिलांजवळ सोडतो असे सांगत तिला बाथरुममधून बाहेर आणून दरवाजातून बाहेर फेकले. धावत्या ट्रेनमधून मुलीला बाहेर फेकून दिल्याचे त्या दुर्दैवी मुलीच्या पालकांनाही माहिती नव्हते. मात्र रेल्वे रुळावर बेशुध्द अवस्थेत पडलेली मुलगी शुध्दीवर आल्यावर हा सर्व प्रकार समोर आला.
दरम्यान ही बाब पुणे रेल्वे लोहमार्गाचे अधिक्षक सदानंद वायसे पाटील यांना समजताच त्यांनी टप्याटप्यात पोलिस थांबवून ही संपूर्ण रेल्वे चेन ओढून जळगाव येथे मध्येच थांबवली आणि संपूर्ण रेल्वेला पोलिसांनी घेरले. मुलीने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण रेल्वेची तपासणी केली असता त्या मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारावर एका सैनिकाला ताब्यात घेतले. त्याने केलेल्या कृत्याची कबुली पोलिसांना दिली आहे. आरोपी प्रभू उपहार हा झाशी येथे सैन्यदलात असून तो बेळगाव येथील राहणारा आहे.
आरोपी प्रभू हा नोकरीवर रुजू होण्यासाठी झाशीला निघाला असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. जखमी मुलीला सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिच्या पायाला तोंडाला आणि हाताला गंभीर मार लागला आहे. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्या मुलीची चौकशी केली असून तिने झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला असून पोलिस पुढचा तपास करत आहेत.