रतन टाटा यांचा उत्तराधिकारी कोण? 'या' मोठ्या व्यक्तीची होतेय चर्चा; टाटा ट्रस्टच्या बैठकीत काय निर्णय होणार?
रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण भारतभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान रतन टाटा यांच्यापश्चात त्यांचा वारसा कोण चालवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : भारताचे सुपूत्र, उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata Death) यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईत 10 ऑक्टोबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या या निधनानंतर भारतासह जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात आले. साश्रू नयनांनी संपूर्ण भारतीयांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. दरम्यान, रतन टाटा यांच्या पश्चात त्यांचा वारसा कोण चालवणार? त्यांच्या साम्राजाच्या उत्तराधिकारी कोण? असे विचारले जात आहे. यावरच आता मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
टाटा ट्रस्टच्या उत्तराधिकारीपदासाठी 'हे' नाव समोर
दिवंगत रतन टाटा यांचा उत्तराधिकारी नेमण्यासाठी टाटा न्यासाची (टाटा ट्रस्ट) आज (11 ऑक्टोबर) महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत टाटा ट्रस्टच्या आगामी प्रमुखाच्या नियुक्तीवर चर्चा होऊ शकते. या ट्रस्टच्या प्रमुखपदासाठी रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांचे नाव सध्या समोर येत आहे.
नोएल टाटा यांच्याकडे 66 टक्के मालकी
नोएल टाटा यांनी टाटा ट्रस्टचे प्रमुख म्हणून नेमले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टाटा ट्रस्टच्या आज होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. बॉम्बे हाऊसमध्ये बंद दाराआड ही चर्चा होणार आहे. नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टमध्ये ट्रस्टी आहेत. त्यांच्याकडे टाटा सन्सची 66 टक्के हिस्सेदारी आहे. त्यामुळे टाटा ट्रस्टच्या उत्तराधिकारीपदासाठी नोएल टाटा हे सर्वाधिक पसंतीच्या व्यक्ती ठरू शकतात.
सध्या टाटा ट्रस्टच्या प्रमुखपदी दोन व्यक्ती आहेत. टीव्हीएस ग्रुपचे वेणु श्रीनिवासन आणि माजी संरक्षण सचिव विजय सिंह अशी या दोघांची नावे आहेत. 2018 सालापासून त्यांच्याकडे ही जबाबदारी आहे. दरम्यान, या संभाव्य बैठकीविषयी टाटा ट्रस्टने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
रतन टाटा यांची संपत्ती किती?
रतन टाटा हे भारतातील प्रसिद्ध आणि सर्वपरिचित असे उद्योगपती होते. मोठे दानशूर व्यक्ती म्हणून त्यांची भारतभरात ओळख होती. करोना महासाथीच्या काळात त्यांनी लोकांना सढळ हाताने मदत केली होती. रतन टाटा हे स्वत: अब्जाधीश होते. त्यांची एकूण संपत्ती 3800 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
हेही वाचा :
पुन्हा पडणार पैशांचा पाऊस, 16 ऑक्टोबर रोजी येणारा 'हा' आयपीओ देणार तब्बल 55 टक्क्यांनी रिटर्न्स?