PPF की FD ? गुंतवणूक नेमकी कशात करावी? जाणून घ्या फायदे आणि तोटे?
पीपीएफ आणि एफडी यापैकी कोणती योजना चांगली आहे, अशा प्रश्न अनेकांना पडतो. पण या दोन्ही योजनांचे आपापले काही फायदे आहेत.
मुंबई : पैसे गुंतवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. काही लोक पीपीएफच्या (PPF) माध्यमातून पैसे गुंतवतात तर काही लोक बँकेत एफडी करून पैशांची गुंतवणूक करतात. पण या दोन्ही योजनांचे आपले काही फायदे आणि तोटे आहेत. पीपीएफवर मिळणारे व्याज दर तीन महिन्यांनी बदलते. एफडीमध्ये मात्र तसे होत नाही. एफडीवर एकदा निश्चित केलेलेच व्याज मिळते.
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पीपीएफ चांगला पर्याय
पीपीएफ योजनेत कर भरण्याची गरज नाही. तर एफडीमध्ये गुंतवलेल्या पैशांच्या व्याजावर टॅक्स स्लॅबनुसार कर द्यावा लागतो. एफडीवर सरकार गॅरन्टी देत नाही. पण पीपीएफमध्ये सरकारकडून गॅरन्टी दिली जाते. पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवायचा आहे आणि निश्चित परतावा मिळवायचा आहे, अशा लोकांसाठी पीपीएफ ही योजना चांगली आहे. दुसरीकडे पीपीएफमध्ये दीर्घ मुदतीसाठी पैशांची गुंतवणूक करता येते. एफडीमध्ये मात्र दीर्घकालीन गुंतवणूक करता येत नाही.
पीपीएफ, एफडीवर व्याज काय मिळते
सेवानिवृत्तीनंतर अनेकजण टॅक्स सेव्हिंगसाठी पीपीएफ योजनेत गुंतवणूक करतात. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पीपीएफ ही योजना चांगला पर्याय ठरू शकते. सध्या पीपीएफ योजनेअंतर्गत जुलै-सप्टेंबर या तिमाहीसाठी 7.1 टक्के व्याज दिलं जातं. एफडीवर एसबीआय (SBI) 6.50 टक्के व्याज देते. समजा तुम्ही एफडीमध्ये दीर्घकालीन मुदतीसाठी पैशांची गुंतवणूक केल्यास आणि मध्येच व्याजदर वाढल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. वाढलेल्या व्याजदाराचा फायदा तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे पीपीएफ ही योजना एफडीपेक्षा अधिक चांगली मानली जाते. एफडीमधील व्याजदर तुमची मुदत संपेपर्यंत स्थिर असतो. तर पीपीएफ योजनेत व्याजदर दर तीन महिन्यांनी बदलतो.
आपत्कालीन स्थितीत पीपीएफमधून पैसे काढता येतात
पीपीएफ योजनेत कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो. तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास ते खाते 15 वर्षांनी म्यॅच्यूअर होते. तुमची मुदत संपल्यानंतर पैसे काढून तुम्ही खाते बंद करू शकता. किंवा पाच-पाच वर्षांनी तुम्ही तुमच्या खात्याचा कालावधी वाढवू शकता. विशेष म्हणजे पीपीएफ योजनेअंतर्गत गरज पडल्यास तुम्हाला काही रक्कम काढतादेखील येते. गुंतवणुकीच्या सात वर्षांनंतर उपचार, आपत्कालीन स्थिती, मुलांचे शिक्षण, लग्न अशा महत्त्वाच्या कामांसाठी हा निधी वापरता येतो. कमी काळासाठी गुंतवणूक करायची असेल तर एफडी चांगला पर्याय आहे. तर दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर पीपीएफ हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.
हेही वाचा :
सोनं, चांदी झाले स्वस्त, नेमकं कारण काय? 10 ग्रॅमसाठी किती रुपये लागणार?
गेल्या वर्षाचा ITR या वर्षी भरता येईल का? दंड किती लागतो? जाणून घ्या नियम काय सांगतो!
घरासाठी कर्ज घेण्याचा विचार करताय? 'या' बँकांचा आहे सर्वांत कमी व्याजदर!