(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गव्हाच्या उत्पादनात विक्रमी वाढ होणार, देशात 114 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज
भारतात (India) यंदा गव्हाच्या उत्पादनात (Wheat Production) मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा गव्हाच्या उत्पादनाचे सर्व विक्रम मोडू शकतात.
Wheat Production: भारतात (India) यंदा गव्हाच्या उत्पादनात (Wheat Production) मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा गव्हाच्या उत्पादनाचे सर्व विक्रम मोडू शकतात. अन्न मंत्रालयाचा अंदाजानुसार, अधिक पेरणी आणि सामान्य हवामानाच्या अपेक्षेमुळे यावर्षी देशात 114 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होऊ शकते. हे गव्हाचे उत्पादन चालू पीक वर्ष 2023-24 मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक असणार आहे. भारत सरकारने यावर्षी गव्हाची एमएसपी 2275 रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. यामुळं बहुतांश शेतकरी गहू विकतील अशी एफसीआयला आशा आहे.
रब्बी हंगामाच्या पेरण्या 8 जानेवारीपर्यंत पूर्ण होतील
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) चे अध्यक्ष आणि एमडी अशोक के मीना यांच्या मते, रब्बी हंगामाची पेरणी 8 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. 25 डिसेंबर 2023 पर्यंत, अंदाजे 320.54 हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली होती. पीक वर्ष 2022-23 (जुलै ते जून) मध्ये गव्हाचे उत्पादन सुमारे 11 कोटी टन होते, तर मागील वर्षी 10.77 कोटी टन गव्हाचे उत्पादन झाले होते. अशोक मीनाच्या म्हणण्यानुसार, यंदा गव्हाची लागवड जास्त होणार आहे. जर हवामान अनुकूल असेल तर उत्पादन सुमारे 114 दशलक्ष टन होईल. याबाबत कृषी मंत्रालयाचाही अंदाज आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रातही वाढ
गतवर्षीच्या तुलनेत गहू पिकाच्या पेरणीखालील क्षेत्रातही वाढ झाली आहे. काही राज्यांमध्ये एक टक्का टंचाई आहे. पण, तेही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होईल. मीना म्हणाले की, गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत (व्हीट एमएसपी) गेल्या वर्षीच्या तुलनेत 7 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यंदा 2275 रुपये प्रतिक्विंटल दराने गव्हाची खरेदी होणार आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण आशा आहे की बहुतांश शेतकरी त्यांचा गहू एफसीआयलाच विकतील.
FCI भारत आटा ब्रँडसाठी गहू देत आहे
एवढ्या मोठ्या प्रमाणावर गव्हाचे उत्पादन होणे ही सरकारसाठी दिलासादायक बाब आहे. कारण एफसीआयच्या साठ्यातून खुल्या बाजारात गहू वितरीत केला जात होता. सरकारनेही भारत आटा ब्रँडसाठी गहू घेतला होता. त्यामुळे एफसीआयचा साठा कमी झाला. आतापर्यंत 59 लाख टन गहू खुल्या बाजारात विकला गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: