इजिप्तमध्ये जाणार भारताचा गहू, 'या' देशांसोबतही चर्चा सुरू
Wheat Export from India: वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गहू निर्यातीबाबत इजिप्तसोबत अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहे. तर, चीन, तुर्कीसोबत चर्चा सुरू आहे.
Wheat Export from India: भारताकडून आता आणखी काही देशांना गव्हांची निर्यात होणार आहे. वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या इजिप्तसोबत निर्यातीबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. तर, चीन, तुर्की आणि इराण आदी देशांमध्ये गव्हाच्या निर्यातीवर चर्चा सुरू आहे.
भारताकडून होणारी गव्हाची निर्यात ही एप्रिल 2021-जानेवारी 2022 च्या दरम्यान वाढून ती 1.74 अब्ज डॉलर इतकी झाली होती. त्याआधीच्या वर्षात या कालावधीत 34.02 कोटी डॉलर इतकी निर्यात करण्यात आली होती.
निर्यात वाढवण्यासाठी बैठक
वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की, कृषी आणि अन्न प्रक्रिया उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) अलीकडेच रशिया-युक्रेन संघर्षामुळे झालेल्या जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे प्रभावित झालेल्या देशांना निर्यात वाढविण्यासंदर्भात एक बैठक आयोजित केली होती.
बांगलादेशला सर्वाधिक गहू निर्यात
या बैठकीत रेल्वेने गव्हाची निर्यात तातडीने करण्यासाठी पुरेसे मालवाहू डबे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. बंदर अधिकाऱ्यांना गव्हाच्या निर्यातीसाठीच असलेल्या टर्मिनल्सची संख्या वाढवण्यास सांगण्यात आले आहे. भारतातून गव्हाची निर्यात प्रामुख्याने शेजारील देशांमध्ये होते. बांगलादेशमध्ये सर्वाधिक गहू निर्यात होतो. याशिवाय, येमेन, अफगाणिस्तान, कतार आणि इंडोनेशियासारख्या देशातील बाजारपेठेत नव्याने प्रवेश केला आहे.
APEDA अध्यक्ष एम अंगमुथू म्हणाले, 'आम्ही राज्य सरकारे आणि निर्यातदार, शेतकरी उत्पादक संघटना, वाहतूकदार यांसारख्या भागधारकांच्या सहकार्याने गव्हाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एक साखळी तयार करण्यावर भर देत आहोत'.
जागतिक पातळीवर गव्हाच्या निर्यातीत भारताचा वाटा एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. मात्र, सन 2016 मध्ये 0.14 इतकी निर्यात करण्यात येत होती. आता यात वाढ झाली असून 2020 मध्ये 0.54 टक्के इतके प्रमाण झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: