3 दिवसात गुजरातला मिळाले 40 हजारांहून अधिक प्रकल्प, व्हायब्रंट गुजरात समिटमधून किती गुंतवणूक?
व्हायब्रंट गुजरातला यावेळीही कंपन्यांकडून विशेष पाठिंबा मिळाला आहे. तीन दिवस चाललेल्या या परिषदेत भारतीय आणि विदेशी कंपन्यांनी गुजरातमध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या अनेक घोषणा केल्या आहेत.
Huge Investment: व्हायब्रंट गुजरातला यावेळीही कंपन्यांकडून विशेष पाठिंबा मिळाला आहे. तीन दिवस चाललेल्या या परिषदेत भारतीय आणि विदेशी कंपन्यांनी गुजरातमध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या अनेक घोषणा केल्या आहेत. अदानी समूह, टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डीपी वर्ल्डसह अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक प्रस्तावांसाठी 41299 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून गुजरातमधील कंपन्यांनी अंदाजे 26.33 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे स्वारस्य दाखवले आहे. यातील बहुतांश सामंजस्य करार हरित ऊर्जा क्षेत्रात करण्यात आले आहेत.
हरित ऊर्जा क्षेत्रात अनेक मोठे सौदे
अधिकृत माहितीनुसार, व्हायब्रंट गुजरातच्या 10 व्या आवृत्तीत हरित ऊर्जा क्षेत्रात अनेक मोठे सौदे करण्यात आले. 2022 मध्ये, कंपन्यांनी गुजरातमध्ये 18.87 लाख कोटी रुपयांच्या 57,241 प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केले होते. 2021 मध्ये होणारी परिषद कोविड-19 च्या संकटामुळं रद्द करण्यात आली होती. अशाप्रकारे, गेल्या दोन आवृत्त्यांमध्ये, एकूण 98540 प्रकल्पांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आणि सुमारे 45 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातमध्ये आली आहे.
परिषदेत 3500 परदेशी प्रतिनिधी सहभागी
व्हायब्रंट गुजरातच्या अधिकृत ट्वीटवर हँडलने पोस्ट केले आहे की सेमीकंडक्टर, ई-मोबिलिटी, ग्रीन हायड्रोजन आणि अक्षय ऊर्जा यासारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली आहे. स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे (विक्षित भारत @2047) स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. या तीन दिवसांत 3500 परदेशी प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते. या कार्यक्रमात 34 भागीदार देश आणि 16 भागीदार संस्था होत्या. या परिषदेचा उपयोग ईशान्येकडील राज्यांमधील गुंतवणुकीच्या शक्यता दर्शविण्यासाठीही करण्यात आला.
या कार्यक्रमात देश-विदेशातील प्रसिद्ध उद्योगपतींनीही घेतला सहभाग
यावर्षी झालेल्या कार्यक्रमात लक्ष्मी मित्तल, तोशिहिरो सुझुकी, मुकेश अंबानी, संजय मेहरोत्रा, गौतम अदानी, जेफ्री चुन, एन चंद्रशेखरन, सुलतान अहमद बिन सुलेम, शंकर त्रिवेदी आणि निखिल कामत इत्यादींनी भाग घेतला. पंतप्रधान मोदींनी बुधवारी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. येत्या काही वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह देखील सहभागी झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या: