India-US Trade: अमेरिका ठरला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार, चीनला टाकलं मागे
व्यापाराच्या बाबतीत अमेरिकेने चीनला पुन्हा एकदा मागे टाकले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला आहे.
India Top Trading Partner: व्यापाराच्या बाबतीत अमेरिकेने चीनला पुन्हा एकदा मागे टाकले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला आहे. मात्र, या काळात भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापारातही वर्षभरापूर्वीच्या तुलनेत घट झाली आहे.
वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर 2023 दरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 59.67 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर 2022 या कालावधीत ते 67.28 अब्ज डॉलर होते, याचा अर्थ भारत आणि अमेरिका यांच्यातील परस्पर व्यापार एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 11.3 टक्क्यांनी कमी झाला आहे.
निर्यातीतही घट
आकडेवारीनुसार, एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत अमेरिकेतील निर्यात 38.28 अब्ज डॉलरवर घसरली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत ते 41.49 अब्ज डॉलर होते. दुसरीकडे, या कालावधीत, अमेरिकेतील आयात वर्षभरापूर्वी 25.79 अब्ज डॉलरवरुन 21.39 अब्ज डॉलरवर घसरली आहे.
चीनसोबतचा व्यापार खूप कमी
याच कालावधीत भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापार 58.11 अब्ज डॉलर होता. एक वर्षापूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण 3.56 टक्के कमी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतातून चीनला होणारी निर्यात किरकोळ घसरुन 7.74 अब्ज डॉलर झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ते 7.84 अब्ज डॉलर होते. या कालावधीत, चीनमधील आयातही एका वर्षापूर्वी 52.42 अब्ज डॉलरवरुन घसरून 50.47 अब्ज झाली आहे.
आगामी काळात व्यवसाय वाढेल
वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, जागतिक मागणीतील कमकुवतपणामुळं भारत आणि अमेरिका यांच्यातील निर्यात आणि आयातीत घट झाली आहे. परंतू लवकरच हा ट्रेंड बदलण्याची अपेक्षा आहे. एजन्सीने तज्ञांच्या हवाल्याने म्हटले आहे की अमेरिकेसोबत भारताचा द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचा कल येत्या काही वर्षांत कायम राहील, कारण दोन्ही देश परस्पर आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: