Cosmos Bank : 'या' बँकेत तुमचं खातं आहे का? कॉसमॉस बँकेत मोठ्या सहकारी बँकेचं विलीनीकरण!
Bank Merger : रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतर आता आणखी एका सहकारी बँकेचे विलीनीकरण झाले आहे.
मुंबई : मुंबई येथील 'दि साहेबराव देशमुख सहकारी बँके'च्या (एसडीसी बैंक) सर्व 11 शाखा (मुंबई येथील 10 आणि सातारा येथील 1) आजपासून रिझर्व्ह बँकेच्या मंजूरीने कॉसमॉस बँकेच्या (Cosmos Bank) शाखा म्हणून ग्राहक सेवेत रूजू झाल्या आहेत. कॉसमॉस बैंकेच्या सर्व अत्याधुनिक सेवा सुविधा आता या ग्राहकांना मिळणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सी. ए. मिलिंद काळे यांनी दिली.
सी. ए. काळे यांनी या विलीनीकरणाची सविस्तर माहिती देताना सांगितले की, सदर विलीनीकरणामुळे ठेवीदारांच्या 143.40 कोटींच्या ठेवींना संरक्षण मिळाले आहे. निगेटिव्ह नेटवर्थ असूनही ठेवीदारांच्या सर्व ठेवींचे संरक्षण करण्याची जबाबदारी कॉसर्मोस बँकेने घेतली आहे, ही सर्वात महत्वाची बाब आहे. दि साहेबराव देशमुख सहकारी बैंकेचा एकूण व्यवसाय 227.54 कोटी रुपये आहे.
कॉसमॉस बैंक आणि साहेबराव देशमुख सहकारी बँकेच्या या ऐच्छिक विलीनीकरणामुळे आमच्या बँकेत आतापर्यंत एकूण 18 लहान बँका विलीन झाल्याची माहिती काळे यांनी दिली. या विलीनीकरणामुळे लाखो ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण यामुळे झाले आहे. कॉसमॉस बैंकेचा आर्थिक पाया भक्कम असून आज अखेर बँकेने 31,660 कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे. तसेच मार्च 2023 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात 151 कोटींचा निव्वळ नफा झाला असून बँकेने आपल्या सभासदांना 8 टक्क्यांचा लाभांश दिला आहे. बँकेचे भाग भांडवल आणि स्वनिधी 2000 कोटींच्यापेक्षा जास्त आहे. तीव्र बँकिंग स्पर्धेमुळे लहान सहकारी बँकांना कामकाज करणे अवघड होऊन बसले आहे. कॉसमॉस बँकेने अशावेळी सहकाराचे तत्व जपत अनेक बैंकांना सहकार्य केले आहे. सहकारी बँकांमध्ये यामुळे ठेवीदार सुरक्षित असल्याची शाश्वती दिली आहे. त्यामुळे अडचणीतील बँकांना खात्रीलायक आधार देण्याची मोठी जबाबदारी सर्वात जुनी सहकारी बैंक असलेली कॉसमॉस बँक पार पाडत असल्याचे सी. ए. काळे यांनी म्हटले.
सदर विलीनीकरणामुळे कॉसमॉस बँकेच्या आता मुंबईमध्ये एकूण 50 शाखा झाल्या आहेत. तर, सात राज्यात एकूण 170 शाखा झाल्या आहेत, पूर्वाश्रमीच्या साहेबराव देशमुख सहकारी बँकेच्या खातेदारांनी, ठेवीदारांनी आपले बँकिंग व्यवहार पूर्ववत सुरू करावेत असेही आवाहन सीए काळे यांनी सर्व खातेदारांना केले आहे. पूर्वाश्रमीच्या साहेबराव देशमुख सहकारी बँकेच्या साकीनाका येथील मुख्य कार्यालयात एका छोटेखानी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, यानिमित्ताने साहेबराव देशमुख सहकारी बँकेचे संचालक तसेच कॉसमॉस बैंकेचे उपाध्यक्ष प्रवीणकुमार गांधी, सर्व संचालक आणि व्यवस्थापकीय संचालिका पेक्षिता ठिपसे उपस्थित होते