(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एलॉन मस्क यांची भारताकडे पाठ, आता थेट चीनच्या दौऱ्यावर; टेस्ला कारविषयी होणार महत्त्वाची चर्चा!
एलॉन मस्क हे भारतात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. पण ऐनवेळी त्यांनी आपला हा दौरा लांबवणीवर टाकला. आता ते चीनमध्ये गेले आहेत.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून अब्जाधीश एलॉन मस्क यांची भारतात विशेष चर्चा चालू होती. ते 21 आणि 22 एप्रिल रोजी भारतात येणार होते. आपल्या या भेटीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. मात्र ऐनवेळी त्यांनी आपला दौरा रद्द केला. दरम्यान, एकीकडे त्यांनी आपला भारतदौरा रद्द केलेला असताना दुसरीकडे मात्र ते थेट चीनच्या भेटीला गेले आहेत. त्यांच्या या चीनच्या दौऱ्यामुळे भारतात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय माध्यमाने मस्क यांच्या चीन दौऱ्याचे वृत्त दिले आहे.
मस्क भारतात येणार होते
एलॉन मस्क यांच्या टेस्ला या कंपनीकडून इलेक्ट्रिक कारनिर्मिती केली जाते. याच कंपनीचा कारखाना भारतात चालू व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. विशेष म्हणजे हा कारखाना भारतात चालू व्हावा यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून एलॉन मस्क 21 आणि 22 एप्रिल रोजी भारतात येणार होते. भारतात येऊन ते नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. टेस्ला कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही टेस्ला कारनिर्मितीच्या कारण्यासाठी भारतात जागेचा शोध चालू केला होता. मात्र ऐनवेळी मस्क यांनी आपला हा दौरा रद्द केला. त्याची माहिती खुद्द मस्क यांनी एक्स या समाजमाध्यमाद्वारे दिली होती.
याआधी मी भारतभेटीस उत्सुक आहे, असे मस्क म्हणाले होते. पण टेस्ला या माझ्या कंपनीच्या इतर कामामुळे मी माझा भारताचा दौरा लांबवणीवर टाकतोय, असे स्षष्टीकरण मस्क यांनी दिले होते. तसेच या वर्षाच्या शेवटी मी भारतात येणार आहे, असेही मस्क यांनी जाहीर केले आहे. त्यानंतर आता ते थेट चीनला गेले आहेत.
मस्क चीनच्या दौऱ्यावर कशाला गेले?
रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार मस्क हे टेस्लाच्या सेल्फ ड्रायव्हिंग गाड्यांना आवश्यक असणाऱ्या FSD या सॉफ्टवेअरला परवानगी मिळावी, यासाठी ते चीनला गेले आहेत. ते चीनमध्ये जाऊन तेथील मोठ्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. तसेच चीनमधील टेस्ला कारमध्ये जो डेटा साठवण्यात आला आहे, तो विदेशात पाठवण्यास परवानगी मिळावी, यासाठीही ते प्रयत्न करणार आहेत. हा डेटा विदेशात पाठवून टेस्ला कार आणखी समृद्ध आणि प्रगत करता यावी, हा यामागचा मस्क यांचा उद्देश आहे.
चीनच्या दौऱ्याचा प्रचार केला नाही
मस्क यांनी भारताच्या दौऱ्याविषयी एक्स समाजमाध्यमावर लिहिले होते. त्यांनी चीनच्या दौऱ्याची फार चर्चा केली नाही. चीनमधील लोकांना टेस्लाच्या कारसाठी एफएसडी लवकरच मिळणार आहे, असे मस्क म्हणाले होते. टेस्ला ही कार चीनमध्ये 2021 सालापूसन आहे. तेव्हापासून टेस्ला कारमध्ये डेटा साठवण्यात आला आहे. पण तो डेटा चीनमध्येच असतो. तो विदेशात पाठवात येत नाही. तसा नियम आहे. हाच नियम शिथील करून हा डेटा परदेशात घेऊन जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मस्क करणार आहेत.
दरम्यान, एलॉन मस्क यांच्या टेस्ला या कंपनीकडून सेल्फ ड्रायव्हिंग कार तयार केल्या जातात. या कारसाठी आवश्यक असणारे FSD सॉफ्टवेअर टेस्ला कारणे याआधीच तयार केलेले आहे. मात्र चीन सरकारने या सॉफ्टवेअरचा वापर करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही.
हेही वाचा :