Tata Starbucks : टाटा स्टारबक्सची मोठी योजना, दर तिसऱ्या दिवशी खुलणार नवीन स्टोअर
Tata Starbucks : टाटा स्टारबक्स कंपनीने कंपनीने 2028 पर्यंत भारतातील आपल्या स्टोअरची संख्या 1,000 पर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे.
Tata Starbucks : टाटा ग्रुपची कंपनी टाटा स्टारबक प्रायव्हेट लिमिटेडने मोठी घोषणा केली आहे. कंपनीने 2028 पर्यंत भारतातील आपल्या स्टोअरची संख्या 1,000 पर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे. याचाच अर्थ कंपनी दर तिसऱ्या दिवशी नवीन स्टोअर उघडणार आहे. याआधी गेल्या नोव्हेंबरमध्ये कंपनीने दीर्घकालीन ट्रिपल शॉट रिइन्व्हेशन धोरण सादर केले होते. यातील संबंधित कामांसाठी स्थानिक भागीदारांचा कौशल्य विकास, ग्राहकांना अधिक समृद्ध अनुभव देऊ करणारे स्टोअर्स सुरू करणे आणि स्टारबक्सच्या जगभरातील ग्राहकांना मूळ भारतीय चवीची कॉफी उपलब्ध करून देणे यावर या धोरणातून भर देण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट होणार
टाटा स्टारबक्सने दिलेल्या माहितीनुसार, 2028 पर्यंत आपल्या स्टोअरची संख्या 1000 पर्यंत नेण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी, कंपनी आपल्या कर्मचार्यांची संख्या दुप्पट करून 8600 इतकी करणार आहे.
छोट्या शहरांमध्येही स्टोअर सुरू करणार
दर तिसर्या दिवशी एक स्टोअर उघडण्याच्या योजनेमुळे कंपनी लहान शहरांमध्येही पोहोचणार आहे. यामध्ये भारतातील द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमध्ये व्यवसायवृद्धी, ड्राइव्ह-थ्रू वाढवणे, एअरपोर्ट्सवरील स्टोअर्स आणि 24 तास चालणारी स्टोअर्स सुरू करून ग्राहक जिथे कुठे असतील तिथे त्यांना उत्तम सेवा कंपनीतर्फे दिली जाणार आहे.
व्यावसायिक कौशल्यांमधील वृद्धी
एफअॅण्डबी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या वंचित गटातील स्त्रियांना व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देऊन टाटा स्टारबक्स या स्त्रियांना सक्षम बनवणार आहे. ट्रस्ट फॉर रिटेलर्स अॅण्ड रिटेल असोसिएशन ऑफ इंडियाची मान्यता असलेल्या स्टारबक्स फाऊंडेशनच्या सहकार्याने 2024 पर्यंत 2000 तरुण महिला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, कौशल्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे. या उपक्रमातील सहभागींसाठी टाटा स्टारबक्सने बेंगळुरु, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबई या शहरांमध्ये काम करताना शिकण्याची (ऑन-द-जॉब) सवलतही देऊ केली आहे.
टाटा स्टारबक्स भारतात सर्वत्र प्रगती करत आहे. त्याचवेळी कॉफीचा अधिक समृद्ध अनुभव देऊ करणे, स्टोअरचे अनोखे स्वरूप आणि मानवीसंबंध अधिक दृढ करण्यासाठी वैयक्तिक क्षणांचा अनुभव या माध्यमातून शाश्वत प्रगतीवर भर दिला जात आहे.
4300 कर्मचारी कार्यरत आहेत
स्टारबक्स स्टोअर्स टाटा स्टारबक्स प्रायव्हेट लिमिटेड या संयुक्त उपक्रमाद्वारे चालवले जातात. हे स्टारबक्स कॉफी – टाटा अलायन्स म्हणून ओळखले जाते. सध्या या कंपनीमध्ये सुमारे 4,300 भागीदार (कर्मचारी) काम करत आहेत जे मोठ्या अभिमानाने हिरवा एप्रन परिधान करतात.