(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Stock Market Opening: अदानी समूहाच्या शेअर दरात मोठी घसरण; सेन्सेक्स, निफ्टीत विक्रीचा जोर
Stock Market Opening: शेअर बाजारात आज मोठी पडझड पाहायला मिळतेय. बाजार उघडताच सेन्सेक्स 60,000 च्या खाली घसरला. बँक निफ्टीतही मोठी घसरण दिसून येत आहे.
Stock Market Opening: शेअर बाजाराची (Share Market) सुरुवात आज घसरणीनं झाली. पण, त्यानंतर काही काळतच बाजारात मोठी विक्री झाल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजारात सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीचे (Nifty) निर्देशांक आज घसरणीसह खुले झाल्याचं पाहायला मिळालं.
आज आशियाई बाजारातून संमिश्र संकेत मिळत आहेत, परंतु रशियन बाजारात जोरदार तेजी दिसून येत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त काल देशांतर्गत शेअर बाजार बंद होते. मात्र आज बाजारातील ट्रेडिंगसाठी संकेत खूपच वाईट आहेत. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आजही मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अदानी समुहाच्या शेअर्समधील घसरणीमुळे देशांतर्गत शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे.
सकाळी 9.45 वाजता काय होती परिस्थिती?
आज (शुक्रवारी) सकाळी पावणेदहाच्या सुमारास सेन्सेक्स 506 अंकांनी म्हणजेच, 0.84 टक्क्यांच्या घसरणीसह 59,698 वर पोहचला. तर, निफ्टी 128 अंकांच्या म्हणजेच, 0.72 टक्क्यांच्या घसरणीसह 17,763.35 वर व्यवहार करत असल्याचं पाहायला मिळालं.
शेअर मार्केट उघडला तेव्हाची परिस्थिती काय?
आजच्या ओपनिंगमध्ये, NSE चा निफ्टी 14.75 अंकांच्या किंचित घसरणीसह 17,877.20 वर उघडला. याशिवाय बीएसई सेन्सेक्स 38.16 अंकांच्या घसरणीसह 60,166.90 वर उघडला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये शेअर बाजाराच्या सुरुवातीपासूनच घसरण पाहायला मिळाली.
अदानी समूहाचे शेअर्स गडगडले
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आजही घसरण पाहायला मिळाली. अदानी विल्मर 5 टक्क्यांनी घसरला असून तो 516.85 रुपयांवर आला आहे. अदानी पोर्ट्समध्ये सुमारे 3 टक्के घसरण झाली आहे आणि ती प्रति शेअर 691.90 रुपये आहे.
अदानी पॉवरमध्येही 5 टक्के घट झाली असून त्याची किंमत प्रति शेअर 247 रुपयांपर्यंत खाली आली आहे. अदानी एंटरप्रायझेस, ज्यांचा एफपीओ (FPO) आज आला आहे, 2.27 टक्क्यांनी घसरून 3311.90 रुपये प्रति शेअर आहे.
अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 13.65 टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे. हा शेअर 2174 रुपयांपर्यंत खाली आला आहे. या शेअरमध्ये 343 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड 10.07 टक्क्यांनी घसरल्यानंतर 187 रुपयांनी घसरून 1670.65 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.
कोणत्या क्षेत्रात वाढ, कोणत्या क्षेत्रात घसरण?
आज घसरण झालेल्या क्षेत्रांमध्ये ऑईल अँड गॅस, ग्राहकोपयोगी वस्तू, पीएसयू बँक, मीडिया, मेटल, एफएमसीजी आणि फाइनांशियल शेअर्समध्ये घसरण झाली. तर ऑटो शेअर्समध्ये आज जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. ऑटो शेअर्समध्ये 1.9 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
बुधवारीही शेअर बाजारात मोठी घसरण
बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. सेन्सेक्स 773 अंकांच्या म्हणजेच 1.27 टक्क्यांच्या घसरणीसह 60205 च्या पातळीवर बंद झाला होता.